भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९६ :
अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :
(१) लाके सभेच्या कोणत्याही बैठकीत, अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष, अथवा उपाध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना उपाध्यक्ष, स्वत: उपस्थित असला तरी, अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही, आणि अनुच्छेद ९५ च्या खंड (२) च्या तरतुदी, अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात, जशा त्या अध्यक्ष, किंवा यथास्थिति, उपाध्यक्ष अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात, तशाच लागू होतील.
(२) अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव लोकसभेत विचाराधीन असताना, त्याबाबतीत त्याला लोकसभेमध्ये भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल आणि अनुच्छेद १०० मध्ये काहीही असले तरी, असे कामकाज चालू असताना, अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर फक्त पहिल्याच फेरीत मतदान करण्याचा त्याला हक्क असेल, पण समसमान मते पडल्यास असा हक्क असणार नाही.