भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ९१ :
उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार :
(१) सभापतीचे पद रिक्त असताना, अथवा जेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करीत असेल किंवा त्याची कार्ये करीत असेल अशा कोणत्याही कालावधीमध्ये, त्या पदाची कर्तव्ये, उपसभापती किंवा उपसभापतीचे पदही रिक्त असेल तर, त्या प्रयोजनाकरता राष्ट्रपती ज्याला नियुक्त करील असा राज्यसभेचा सदस्य, पार पाडील.
(२) राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत, सभापती अनुपस्थित असताना उपसभापती, किंवा तोही अनुपस्थित असल्यास, राज्यसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती, किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास, राज्यसभा ठरवील अशी अन्य व्यक्ती, सभापती म्हणून कार्य करील.