भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८६ :
राष्ट्रपतीचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क :
(१) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहास किंवा एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करू शकेल, आणि त्या प्रयोजनाकरता सदस्यांना उपस्थित राहणे आवश्यक करू शकेल.
(२) राष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाला संदेश पाठवू शकेल–मग तो संसदेमध्ये त्यावेळी प्रलंबित असलेल्या एखाद्या विधेयकाबाबत असोत किंवा अन्य प्रकारचा असोत–आणि ज्या सभागृहाला अशा प्रकारे कोणताही संदेश पाठवण्यात आला आहे ते सभागृह, त्या संदेशानुसार जी बाब विचारात घेणे आवश्यक असेल अशी कोणतीही बाब सोयीनुसार शक्य तितक्या त्वरेने विचारात घेईल.