Constitution अनुच्छेद ६६ : उपराष्ट्रपतीची निवडणूक :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६६ :
उपराष्ट्रपतीची निवडणूक :
(१) उपराष्ट्रपती, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे १.(संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचकगणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल.
(२) उपराष्ट्रपती, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य, उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला तर, तो उपराष्ट्रपती म्हणून आपले पद ग्रहण करील त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल.
(३) कोणतीही व्यक्ती,—-
(क) भारताची नागरिक,
(ख) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची, आणि
(ग) राज्यसभेची सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त,
असल्याखेरीज उप राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.
(४) एखादी व्यक्ती, भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणाच्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकाऱ्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद धारण करत असेल तर, ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदाच्या प्रयोजनांकरता, केवळ एखादी व्यक्ती ही, संघराज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल २.(***) आहे अथवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे, एवढ्याच कारणाने ती एखादे लाभपद धारण करते, असे मानले जाणार नाही.
———————–
१. संविधान (अकरावी सुधारणा) अधिनियम, १९६१ याच्या कलम २ द्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सत्रात जमलेल्या सदस्यांकडून निवडला जाईल याऐवजी दाखल केला.
२.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ आणि अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुख किंवा उपराजप्रमुख हा मजकूर गाळला.

Leave a Reply