Constitution अनुच्छेद ६५ : राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ६५ :
राष्ट्रपतीचे पद निमित्तवशात् रिक्त होईल त्या त्या प्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्याची कार्ये पार पाडणे :
(१) राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, त्याने राजीनामा दिला किंवा त्यास पदावरून दूर केले गेले या कारणामुळे किंवा अन्यथा त्याचे पद केव्हाही रिक्त झाल्यास, असे रिक्त पद भरण्याबाबत या प्रकरणात असलेल्या तरतुदींनुसार निवडून आलेला नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करील.
(२) जेव्हा अनुपस्थिती, आजार किंवा अन्य कोणतेही कारण यामुळे राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा, राष्ट्रपती आपला कार्यभार पुन्हा हाती घेईल त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपती त्याची कार्ये पार पाडील.
(३) उपराष्ट्रपती, ज्यावेळी अशाप्रकारे राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा त्याची कार्ये पार पाडत असेल त्या अवधीत व त्या अवधीच्या संबंधात, त्यास राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व उन्मुक्ती असतील व संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना आणि जोपर्यंत त्या संबंधात याप्रमाणे तरतूद करण्यात येत नाही तोपर्यंत, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना, तो हक्कदार असेल.

Leave a Reply