भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५६ :
राष्ट्रपतीचा पदावधी :
(१) राष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील :
परंतु असे की,—-
(क) राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल ;
(ख) राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केल्याबद्दल त्याला अनुच्छेद ६१ मध्ये तरतूद केलेल्या रीतीने महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येईल ;
(ग) राष्ट्रपती, आपला पदावधी संपला असला तरीही, त्याचा उत्तराधिकारी त्याचे पद ग्रहण करीपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवील.
(२) उपराष्ट्रपती, खंड (१) च्या परंतुकाच्या खंड (क) अन्वये त्यास संबोधून लिहिलेल्या कोणत्याही राजीनाम्याचे वृत्त, लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळवील.
