Constitution अनुच्छेद ५१-क : मूलभूत कर्तव्ये :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
१.(भाग चार-क :
मूलभूत कर्तव्ये :
अनुच्छेद ५१-क :
मूलभूत कर्तव्ये :
(क) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;
(ख) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे ;
(ग) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ;
(घ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ;
(ङ) धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ;
(च) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;
(छ) वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;
(ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;
(झ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;
(ञ) राष्ट्र सातत्याने, उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे ;
२.((ट) मातापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा, यथास्थिति, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे,)
ही प्रत्येक भारतीय नागरिकाची कर्तव्ये असतील.)
——————
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ११ द्वारे समाविष्ट केला (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (शहाएैंशीवी सुधारणा) अधिनियम, २००२ याच्या कलम ४ द्वारे समाविष्ट केला (१ एप्रिल २०१० रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply