भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३७१-ञ :
१.(कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतुदी :
(१) राष्ट्रपतीला, कर्नाटक राज्यसंबंधी काढलेल्या आदेशाद्वारे, पुढील बाबींसाठी राज्यपालाच्या कोणत्याही विशेष जबाबदारीसाठी तरतूद करता येईल.—-
क) मंडळाच्या कामकाजावरील अहवाल प्रत्येक वर्षी राज्य विधानसभेसमोर ठेवण्यात येईल या तरतुदीसह हैद्राबाद – कर्नाटक प्रदेशासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना;
(ख) संपूर्णपणे राज्याच्या गरजांना अधीन राहून, उक्त प्रदेशावरील विकासविषयक खर्चासाठी निधीचे समन्याय वाटप; आणि
(ग) संपूर्णपणे राज्याच्या गरजांना अधीन राहून, सार्वजनिक रोजगार, शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण यांबाबत उक्त प्रदेशातील लोकांसाठक्ष समन्याय संधी आणि सुविधा.
(२) खंड (१) च्या उप-खंड (ग) अन्वये काढलेल्या आदेशाद्वारे पुढील बाबीसाठी तरतूद करता येईल—-
(क) जन्माने किंवा अधिवासाने त्या प्रदेशातील असलेल्या विद्याथ्र्यांसाठी हैद्राबाद-कर्नाटक प्रदेशातील शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यामधील प्रमाणबद्ध जागांचे आरक्षण; आणि
(ख) राज्य शासनाच्या अंतर्गत आणि हैद्राबाद – कनार्टक प्रदेशातील राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील कोणताही निकाय किंवा संघटना यामधील पदांची किंवा पदांच्या संवर्गांची निश्चिती आणि जन्माने किंवा अधिवासाने त्या प्रदेशातील असलेल्या व्यक्तींसाठी अशा प्रमाणबद्ध पदांचे आरक्षण आणि सरळ सेवाप्रवेशाने किंवा पदोन्नतीने किंवा आदेशामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा इतर कोणत्याही रीतीने त्या पदांवर नियुक्ती.)
———
१.संविधान (अठ्ठ्याण्णवावी सुधारणा) अधिनियम, २०१२ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला.