Constitution अनुच्छेद ३६१-क : संसदेच्या व राज्य विधानमंडळांच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३६१-क :
१.(संसदेच्या व राज्य विधानमंडळांच्या कामकाजवृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण :
(१) संसदेचे कोणतेही सभागृह अथवा राज्याची विधानसभा, किंवा यथास्थिति, त्याच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह, याच्या कोणत्याही कामकाजाचे सारत: खरे प्रतिवृत्त वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याच्या संबंधात कोणतीही व्यक्ती, कोणत्याही न्यायालयामध्ये अशी प्रसिद्धी विद्वेषपूर्वक करण्यात आली आहे, असे शाबीत करण्यात आले नसेल तर, कोणत्याही फौजदारी किंवा दिवाणी कार्यवाहीस पात्र होणार नाही :
परंतु असे की, संसदेचे कोणतेही सभागृह अथवा एखाद्या राज्याची विधानसभा, किंवा यथास्थिति, त्याच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह यांच्या एखाद्या गुप्त बैठकीच्या कामकाजाचे कोणतेही प्रतिवृत्त, प्रसिद्ध करण्याबाबत या खंडातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही.
(२) खंड (१) ज्याप्रमाणे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रतिवृत्तांच्या किंवा बाबींच्या संबंधात लागू होतो त्याचप्रमाणे तो, ध्वनिक्षेपण केंद्राच्या सहाय्याने सादर केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा सेवेचा भाग म्हणून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे ध्वनिक्षेपित केलेल्या प्रतिवृत्तांच्या किंवा बाबींच्या संबंधातही लागू असेल.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदातील वृत्तपत्र यात, वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाचा मजकूर ज्यात अंतर्भूत आहे अशा, एखाद्या वृत्तसंस्थेच्या प्रतिवृत्तांचा समावेश आहे.)
———–
१. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ४२ द्वारे समाविष्ट केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply