भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३२६ :
लोकसभा व राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होणे :
लोकसभेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका, प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतील, म्हणजे जी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये त्यासंबंधात निश्चित करण्यात येईल अशा दिनांकास १.(अठरा वर्षाहून) कमी वयाची नाही आणि या संविधानान्वये किंवा समुचित विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये अनिवास, मनाची विकलता, गुन्हा अथवा भ्रष्ट किंवा अवैध आचरण या कारणावरून अन्यथा अपात्र ठरलेली नाही, अशी प्रत्येक व्यक्ती, अशा कोणत्याही निवडणुकीस मतदार म्हणून नोंदवली जाण्यास हक्कदार असेल.
—————
१ संविधान (एकसष्टावी सुधारणा) अधिनियम, १९८८ याच्या कलम २ द्वारे एकवीस वर्षाहून या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.