भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३१० :
संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा पदावधी :
(१) या संविधानामध्ये स्पष्टपणे तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, जी व्यक्ती संघराज्याची संरक्षण सेवा किंवा नागरी सेवा किंवा अखिल भारतीय सेवा यांची सदस्य असेल अथवा संघराज्याच्या अधीन असलेले, संरक्षणाशी संबंधित असलेले कोणतेही पद किंवा कोणतेही नागरी पद धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती, राष्ट्रपतीची मर्जी असेतोपर्यंत ते पद धारण करील, आणि जी व्यक्ती राज्याच्या नागरी सेवेची सदस्य असेल किंवा राज्याच्या नियंत्रणाखाली असलेले कोणतेही नागरी पद धारण करत असेल अशी प्रत्येक व्यक्ती, राज्याच्या राज्यपालाची १.(*) मर्जी असेतोपर्यंत ते पद धारण करील.
(२) संघराज्याच्या किंवा एखाद्या राज्याच्या नियंत्रणाखाली असलेले नागरी पद धारण करणारी व्यक्ती, राष्ट्रपतीची, किंवा यथास्थिति, राज्याच्या राज्यपालाची १.(***) मर्जी असेतोपर्यंत पद धारण करीत असली तरीही, संरक्षण सेवेची अथवा अखिल भारतीय सेवेची अथवा संघराज्य किंवा राज्य यांच्या नागरी सेवेची सदस्य नसलेली व्यक्ती, या संविधानाखाली असे पद धारण करण्याकरता ज्या संविदेअन्वये नियुक्त केली जाईल अशा कोणत्याही संविदेमध्ये, जर विशेष अर्हता असणाऱ्या व्यक्तीची सेवा प्राप्त करून घेण्याकरता तसे आवश्यक आहे असे, राष्ट्रपतीला, किंवा यथास्थिति, त्या राज्यपालाला १.(***) वाटेल तर, संमत कालावधीच्या समाप्तीपूर्वी ते पद नष्ट करण्यात आल्यास किंवा त्या व्यक्तीच्या गैरवर्तणुकीशी संबंध नसलेल्या कारणास्तव तिला ते पद रिक्त करावे लागल्यास, तिला भरपाई देण्यात यावी, अशी तरतूद करता येईल.
————–
१.संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकूर गाळला.