भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३०० :
दावे आणि कार्यवाही :
(१) भारत सरकारला किंवा त्याच्याविरूद्ध भारतीय संघराज्याच्या नावे दावा करता येईल व राज्याच्या शासनाला किंवा त्याच्याविरूद्ध त्या राज्याच्या नावे दावा करता येईल आणि या संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांच्या आधारे अधिनियमित केलेल्या संसदेच्या किंवा अशा राज्य विधानमंडळाच्या अधिनियमांद्वारे करण्यात येतील अशा कोणत्याही तरतुदींना अधीन राहून, त्यांच्या आपापल्या कारभारासंबंधात त्यांना किंवा त्यांच्याविरूद्ध जर हे संविधान अधिनियमित झाले नसते तर, डोमिनिअन ऑफ इंडिया आणि तेथील संबंधित असलेले प्रांत किंवा तेथील संबंधित भारतीय संस्थाने यांना किंवा त्यांच्याविरूद्ध ज्या प्रकरणांमध्ये दावा करता आला असता, त्या सारख्याच प्रकरणांमध्ये दावा करता येईल.
(२) जर या संविधानाच्या प्रारंभी,—–
(क) ज्यामध्ये डोमिनिअन ऑफ इंडिया हा एक पक्षकार आहे, अशी कोणतीही विधिविषयक कार्यवाही प्रलंबित असेल तर, त्या कार्यवाहीत डोमिनिअनच्या जागी भारतीय संघराज्य आले असल्याचे मानले जाईल ; आणि
(ख) ज्यामध्ये एखादा प्रांत किंवा भारतीय संस्थान हा एक पक्षकार आहे, अशी कोणतीही विधिविषयक कार्यवाही प्रलंबित असेल तर, त्या कार्यवाहीत प्रांताच्या किंवा भारतीय संस्थानाच्या जागी तेथील संबंधित असलेले राज्य आले असल्याचे मानले जाईल.