भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २७४ :
राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत अशा कर आकारणीवर परिणाम करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्वशिफारस आवश्यक :
(१) राज्ये हितसंबंधित आहेत असा कोणताही कर किंवा शुल्क बसवणारे किंवा त्यात बदल करणारे, अथवा भारतीय प्राप्तिकरासंबंधीच्या अधिनियमितींच्या प्रयोजनांकरिता व्याख्या केलेल्या कृषि उत्पन्न या शब्दप्रयोगाच्या अर्थामध्ये बदल करणारे अथवा या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींअन्वये राज्यांना ज्या तत्त्वांवर पैसा वितरित करता येतो किंवा येईल त्यांवर परिणाम करणारे अथवा या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये उल्लेखिलेला असा कोणताही अधिभार संघराज्याच्या प्रयोजनार्थ बसवणारे असे कोणतेही विधेयक किंवा सुधारणा, राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रस्तुत केली किंवा मांडली जाणार नाही.
(२) या अनुच्छेदातील, राज्ये ज्यात हितसंबंधित आहेत असा कर किंवा शुल्क या शब्दप्रयोगाचा अर्थ,—-
(क) ज्याचे निव्वळ उत्पन्न पूर्णत: किंवा अंशत: कोणत्याही राज्यास नेमून दिले जाते, असा कर किंवा शुल्क ; किंवा
(ख) ज्याच्या निव्वळ उत्पन्नाच्या संदर्भात कोणत्याही राज्यास भारताच्या एकत्रित निधीतून त्या त्या वेळी रकमा प्रदेय असतील, असा कर किंवा शुल्क, असा आहे.