भारताचे संविधान ( राज्यघटना )
भाग नऊ ख :
१.(सहकारी संस्था :
अनुच्छेद २४३ यज :
व्याख्या :
या भागात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर-
क) प्राधिकृत व्यक्ती याचा अर्थ, अनुच्छेद २४३ यथ मध्ये त्या अर्थाने निर्दिष्ठ केलेली व्यक्ती असा आहे.
ख) मंडळ याचा अर्थ, ज्याच्याकडे एखाद्या सहकारी संस्थेच्या कारभाराच्या व्यवस्थापनाचे संचालन व नियंत्रण सोपविण्यात आलेले असेल, असे त्या सहकारी संस्थेचे संचालक मंडळ किंवा नियामक मंडळ मग ते कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो – असा आहे;
ग)सहकारी संस्था याचा अर्थ, कोणत्याही राज्यात त्या त्या वेळी अमलात असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी केलेली किंवा नोंदणी केली असलेली मानण्यात आलेली संस्था, असा आहे;
घ) बहुराज्यीय सहकारी संस्था याचा अर्थ, एका राज्यापुरती उदिष्टे मर्यादित नसलेली आणि सहकारी संस्थांशी संबंधित त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी केलेली किंवा नोंदणी केलेली असल्याचे मानन्यात असलेली संस्था असा आहे;
ङ) पदाधिकारी याचा अर्थ, सहकारी संस्थेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभाध्यक्ष, उपसभाध्यक्ष, सचिव किंवा कोशापाल, असो आहे आणि त्यात कोणत्याही सहकारी संस्थेच्या बोर्डने निवडून द्यावयाच्या अन्य कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो;
च) निबंधक याचा अर्थ, बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संबंधात, केंद्रसरकारने नियुक्त केलेला केंद्रीय निबंधक आणि सहकारी संस्थांच्या संबंधात, राज्य विधी मंडळाने केलेल्या कायद्यान्वये राज्यशासनाने नियुक्त केलेला सहकारी संस्थांचा निबंधक असा आहे;
छ) राज्य अधिनियम याचा अर्थ, राज्य विधी मंडळाने केलेला कोणताही कायदा असा आहे.
ज) राज्यस्तरीय सहकारी संस्था याचा अर्थ, संपूर्ण राज्यभर कार्यक्षेत्र असलेली आणि राज्यविधी मंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्यात त्या अर्थाने व्याख्या केलेली सहकारी संस्था असा आहे;
————
१.संविधान (सत्त्यान्नववे संशोधन) अधिनियम, २०११ च्या कलम ४ द्वारा (१५-२-२०१२) पासून अंत:स्थापित.