भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-यग :
विवक्षित क्षेत्रांना हा भाग लागू नसणे :
(१) या भागातील कोणतीही बाब, अनुच्छेद २४४ च्या खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या अनुसूचित क्षेत्रांना आणि खंड (२) मध्ये निर्देशिलेल्या जनजाति क्षेत्रांना लागू होणार नाही.
(२) या भागातील कोणत्याही बाबीचा अन्वयार्थ पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्याच्या पहाडी क्षेत्रांसाठी त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित केलेल्या दार्जिलिंग गुरखा पहाडी परिषदेची कार्ये व अधिकार यांना बाधा पोहोचेल, अशा प्रकारे लावण्यात येणार नाही.
(३) या संविधानामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, संसदेला, कायद्याद्वारे, अशा कायद्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील असे अपवाद व फेरबदल यांना अधीन राहून, खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या अनुसूचित क्षेत्रांमध्ये व जनजाति क्षेत्रांमध्ये या भागातील तरतुदींचा विस्तार करता येईल आणि असा कोणताही कायदा, अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांसाठी या संविधानाची सुधारणा असल्याचे मानण्यात येणार नाही.