भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-थ :
नगरपालिका घटित करणे :
(१) या भागाच्या तरतुदीनुसार, प्रत्येक राज्यामध्ये,—–
(क) संक्रमणशील क्षेत्रासाठी म्हणजेच, ग्रामीण क्षेत्रामधून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमण होत असेल अशा क्षेत्रासाठी एक नगर पंचायत
(मग तिला कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो);
(ख) थोड्या लहान नागरी क्षेत्रासाठी एखादी नगरपरिषद ; आणि
(ग) अधिक मोठ्या नागरी क्षेत्रासाठी एखादी महानगरपालिका, घटित करण्यात येईल :
परंतु असे की, क्षेत्राचा आकार आणि त्या क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांकडून पुरविण्यात येणाऱ्या किंवा पुरविण्याचे प्रस्तावित केलेल्या नगरपालिका सेवा आणि राज्यपालाला योग्य वाटतील असे इतर घटक विचारात घेऊन, राज्यपाल जाहीर अधिसूचनेद्वारे जे क्षेत्र औद्योगिक वसाहत म्हणून घोषित करील अशा नागरी क्षेत्रात किंवा त्याच्या भागात या खंडान्वये नगरपालिका घटित करता येणार नाही.
(२) या अनुच्छेदामधील संक्रमणशील क्षेत्र, थोडे लहान नागरी क्षेत्र किंवा अधिक मोठे नागरी क्षेत्र याचा अर्थ, त्या क्षेत्राची लोकसंख्या, तेथील लोकसंख्येची घनता, स्थानिक प्रशासनासाठी निर्माण होणारा महसूल, कृषीतर कार्यक्रमांमधील रोजगाराची टक्केवारी व आर्थिक महत्त्वाचे किंवा राज्यपालाला योग्य वाटतील असे इतर घटक विचारात घेऊन, राज्यपाल या भागाच्या प्रयोजनांसाठी जाहीर अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे क्षेत्र, असा होतो.