भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ट :
पंचायतींच्या निवडणुका :
(१) पंचायतींच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या, आणि निवडणुका घेण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन आणि नियंत्रण, राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाकडे निहित असेल.
(२) राज्याच्या विधानमंडळाकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य निवडणूक आयुक्ताच्या पदाच्या सेवाशर्ती आणि पदावधी, राज्यपाल नियमाद्वारे निश्चित करील, त्याप्रमाणे असेल :
परंतु असे की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने व ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने व अन्य कारणावरुन राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही, आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवाशर्तींमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर, त्याला अहितकारक होतील अशा प्रकारे बदल केला जाणार नाही.
(३) खंड (१) द्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेली कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक असेल असा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने केल्यास, राज्याचा राज्यपाल, राज्य निवडणूक आयोगास असा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देईल.
(४) या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याचे विधानमंडळ, कायद्याद्वारे, पंचायतींच्या निवडणुकांशी संबंधित किंवा निगडित असणाऱ्या सर्व बाबींसाठी तरतूद करील.