भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २०६ :
लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने :
(१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, राज्याच्या विधानसभेला,——-
(क) कोणत्याही वित्तीय वर्षाच्या एखाद्या भागासाठी अंदाजिलेल्या खर्चाबाबतच्या कोणत्याही अनुदानावरील मतदानाकरिता अनुच्छेद २०३ मध्ये विहित केल्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्या खर्चाच्या संबंधात अनुच्छेद २०४ च्या तरतुदींच्या अनुसार कायदा पारित होईपर्यंत, असे कोणतेही अनुदान आगाऊ देण्याचा ;
(ख) राज्याच्या साधनसंपत्तीतून पुरी करावयाची एखादी मागणी त्या सेवेचा व्याप किंवा तिचे अनिश्चित स्वरूप यामुळे वार्षिक वित्तीय विवरणपत्रात साधारणत: दिल्या जाणाऱ्या तपशिलांसह नमूद करता येत नसेल तेव्हा, अशी अनपेक्षित मागणी पुरी करण्याकरिता अनुदान देण्याचा ;
(ग) जे कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू सेवेचा भाग होत नाही असे अपवादात्मक अनुदान देण्याचा, अधिकार असेल आणि ज्या प्रयोजनांकरिता उक्त अनुदाने दिली असतील त्याकरिता राज्याच्या एकत्रित निधीतून पैसे काढण्यास कायद्याद्वारे अधिकृत मंजुरी देण्याचा राज्य विधानमंडळाला अधिकार असेल.
(२) अनुच्छेद २०३ व २०४ यांच्या तरतुदी जशा त्या, वार्षिक वित्तीय विवरणपत्रात नमूद केलेल्या कोणत्याही खर्चासंबंधी अनुदान देण्याच्या आणि असा खर्च भागवण्याकरता राज्याच्या एकत्रित निधीतील पैशांच्या विनियोजनास अधिकृत मंजुरी देण्यासाठी करावयाच्या कायद्याच्या संबंधात प्रभावी आहेत, तशाच त्या, खंड (१) अन्वये कोणतेही अनुदान देण्याच्या आणि त्या खंडान्वये करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधात प्रभावी असतील.