भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २०३ :
अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती :
(१) अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. पण विधानमडं ळात त्यांपैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे, असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही.
(२) उक्त अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग अन्य खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, अनुदानार्थ मागण्यांच्या रूपाने विधानसभेला सादर केला जाईल आणि विधानसभेला कोणत्याही मागणीस अनुमती देण्याचा, किंवा अनुमती देण्यास नकार देण्याचा, किंवा तीत विनिर्दिष्ट केलेल्या रकमेत कपात करून त्या मागणीस अनुमती देण्याचा अधिकार असेल.
(३) कोणतीही अनुदानार्थ मागणी, राज्यपालाची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही.