भारताचे संविधान ( राज्यघटना )
स्वातंत्र्याचा हक्क
अनुच्छेद १९ :
भाषणस्वातंत्र्य, इत्यादीसंबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण :
(१) सर्व नागरिकांस,—–
(क) भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ;
(ख) शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ;
(ग) अधिसंघ वा संघ १.(किंवा सहकारी संस्था) बनविण्याचा ;
(घ) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ;
(ङ) भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा ;
१.(आणि )
२.(****)
(छ) कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल.
३.((२) खंड (१) चा उपखंड (क) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे ४.(भारताची सार्वभौमता व एकात्मता), राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी, अथवा न्यायालयाचा अवमान, अब्रूनुकसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.)
(३) उक्त खंडाचा उपखंड (ख) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे, ४.(भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा), सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी, जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
(४) उक्त खंडाचा उपखंड (ग) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे ५.(भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा), सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी, जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
(५) उक्त खंडामधील ६.(उपखंड (घ) व (ड)) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे, सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही.
(६) उक्त खंडाच्या उपखंड (छ) यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, उक्त उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्यांद्वारे, सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि विशेषत: ७.(उक्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे, जो कायदा,—
(एक) कोणताही पेशा आचरण्याकरता अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याकरता आवश्यक असलेल्या पेशाविषयक किंवा तंत्रविषयक अर्हता, किंवा
(दोन) नागरिकांना पूर्णत: किंवा अंशत: वगळून अथवा अन्यथा, राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियत्रंण असलेल्या महामडंळाने कोणताही व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालवणे, याच्ंयाशी जेथवर संबद्ध असेल तेथवर, अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही.)
—————————-
१. संविधान (सत्त्याण्णवावी सुधारणा) अधिनियम, २०११ कलम २ द्वारे समाविष्ट केला (१२ जानेवारी २०१२ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
३. वरील अधिनियमाच्या कलम २ द्वारे खंड (च) गाळला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).
४. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ३ द्वारे मूळ खंड (२) ऐवजी दाखल केला (भूतलक्षी प्रभावासह).
५. संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम, १९६३ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला.
६. संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम २ द्वारे उपखंड (घ), (ङ) व (च) या मजकुराऐवजी दाखल केला (२० जून,१९७९ रोजी व तेव्हापासून).
७. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम ३ द्वारे विवक्षित मूळ शब्दांऐवजी दाखल केला.