भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८९ :
सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती :
(१) या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या कोणत्याही बैठकीतील सर्व प्रश्न अध्यक्ष किंवा सभापती, अथवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निर्णीत केले जातील.
अध्यक्ष किंवा सभापती, अथवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती, पहिल्या फेरीत मतदान करणार नाही, पण मते समसमान झाल्यास, तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल व तो अधिकार ती वापरील.
(२) राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या सदस्यत्वाची कोणतीही जागा रिक्त असली तरी, त्या सभागृहाला कार्य करण्याचा अधिकार असेल आणि राज्य विधानमंडळातील कोणतेही कामकाज, त्या कामकाजाच्या वेळी तेथे स्थानापन्न होण्याचा किंवा मतदान करण्याचा किंवा अन्यथा भाग घेण्याचा जिला हक्क नव्हता अशा एखाद्या व्यक्तीने ते केले आहे, असे मागाहून आढळून आले तरीही विधिग्राह्य राहील.
१.(३) राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत, राज्य विधानमंडळाच्या सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही, दहा सदस्य किंवा त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक-दशांश यांपैकी जी अधिक असेल, तितकी असेल.
(४) राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सभा चालू असताना, एखाद्या वेळी गणपूर्ती झालेली नसेल तर, सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे हे अध्यक्षाचे किंवा सभापतीचे, किंवा त्या नात्याने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल.)
——–
१. संविधान (बेचाळीसावे संशोधन) अधिनियम १९७६ याच्या कलम ३१ द्वारे काही शब्द (तारीख अधिसूचित केलेली नाही) वगळण्यात आले. ही दुरुस्ती (२०-६-१९७९ पासून) संविधान (चव्वेचाळीसावी सुधारणा) अधिनियम १९७८ च्या कलम ४५ द्वारे वगळण्यात आली.