Constitution अनुच्छेद १८५ : सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८५ :
सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :
(१) विधानपरिषदेच्या कोणत्याही बैठकीत, सभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, सभापती, अथवा उपसभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, उपसभापती, स्वत: उपस्थित असला तरी, अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही आणि अनुच्छेद १८४ च्या खंड (२) च्या तरतुदी, जशा त्या, सभापती, किंवा यथास्थिति, उपसभापती अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात, तशाच त्या पूर्वोक्त अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात लागू होतील.
(२) सभापतीस त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विधानपरिषदेत विचाराधीन असताना त्याला विधानपरिषदेमध्ये भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल, आणि अनुच्छेद १८९ मध्ये काहीही असले तरी, असे कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर फक्त पहिल्याच फेरीत मतदान करण्याचा त्याला हक्क असेल, पण मते समसमान झाल्यास मात्र नाही.

Leave a Reply