भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १६९ :
राज्यांमध्ये विधानपरिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे :
(१) अनुच्छेद १६८ मध्ये काहीही असले तरी, विधानपरिषद असलेल्या राज्यात अशी विधानपरिषद विसर्जित करण्याकरता अथवा अशी विधानपरिषद नसलेल्या राज्यात अशी विधानपरिषद निर्माण करण्याकरता, त्या राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्य-संख्येच्या बहुमताने आणि सभागृहातील उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन-तृतीयांशाहून कमी नाही इतक्या बहुमताने तशा आशयाचा ठराव पारित केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल.
(२) खंड (१) मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये त्या कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतील अशा या संविधानाच्या सुधारणेच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशा पूरक, आनुषंगिक व परिणामस्वरूप तरतुदी अंतर्भूत असू शकतील.
(३) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा हा, या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही.