भारताचे संविधान ( राज्यघटना )
मंत्रिपरिषद :
अनुच्छेद १६३ :
राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद :
(१) राज्यपालास आपले कार्याधिकार वापरण्याच्या कामी, या संविधानानुसार किंवा त्याअन्वये त्याने आपले कार्याधिकार किंवा त्यांपैकी कोणताही कार्याधिकार स्वविवेकानुसार वापरणे आवश्यक असेल तेवढी मर्यादा खेरीजकरून एरव्ही, सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद असेल.
(२) एखादी बाब, जिच्याबाबत राज्यपालाने या संविधानानुसार किंवा त्याखाली स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे अशा स्वरूपाची आहे किंवा नाही, असा कोणताही प्रश्न उद्भवला तर, राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल आणि राज्यपालाने केलेल्या कोणत्याही गोष्टीची विधिग्राह्यता, त्याने स्वविवेकानुसार कृती करावयास हवी होती किंवा नको होती, या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही.
(३) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.