भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ११६ :
लेखानुदाने प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने :
(१) या प्रकरणाच्या पूर्वगामी तरतुदींमध्ये काहीही असले तरी, लाके सभेला,—-
(क) कोणत्याही वित्तीय वर्षाच्या एखाद्या भागासाठी अंदाजिलेल्या खर्चाबाबतच्या कोणत्याही अनुदानावरील मतदानाकरता, अनुच्छेद ११३ मध्ये विहित केलेली प्रक्रिया पूर्ण होऊन त्या खर्चाच्या संबंधात अनुच्छेद ११४ च्या तरतुदींच्या अनुसार कायदा पारित होई पर्यंत, असे कोणतेही अनुदान आगाऊ देण्याचा ;
(ख) भारताच्या साधनसंपत्तीतून पुरी करावयाची एखादी मागणी, त्या सेवेचा व्याप किंवा तिचे अनिश्चित स्वरूप यामुळे वार्षिक वित्तीय विवरणपत्रात साधारणत: दिल्या जाणाऱ्या तपशिलांसह नमूद करता येत नसेल तेव्हा, अशी अनपेक्षित मागणी पुरी करण्याकरता अनुदान देण्याचा ;
(ग) जे कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू सेवेचा भाग होत नाही असे अपवादात्मक अनुदान देण्याचा, अधिकार असेल आणि ज्या प्रयोजनांकरता उक्त अनुदाने दिली असतील त्यांकरता भारताच्या एकत्रित निधीतून पैसे काढणे कायद्याद्वारे प्राधिकृत करण्याचा संसदेला अधिकार असेल.
(२) अनुच्छेद ११३ व ११४ यांच्या तरतुदी जशा त्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रात नमूद केलेल्या कोणत्याही खर्चासंबंधी अनुदान देण्याच्या आणि असा खर्च भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कायद्याच्या संबंधात प्रभावी आहेत, तशाच त्या खंड (१) अन्वये कोणतेही अनुदान देण्याच्या आणि त्या खंडान्वये करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधात प्रभावी असतील.