Constitution अनुच्छेद ११५ : पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ११५ :
पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने :
(१) जर,—-
(क) अनुच्छेद ११४ च्या तरतुदींच्या अनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे, चालू वित्तीय वर्षात एखाद्या विशिष्ट सेवेकरता खर्च करावयाची म्हणून प्राधिकृत केलेली रक्कम, त्या वर्षाच्या प्रयोजनांकरता अपुरी असल्याचे आढळून आले तर, अथवा चालू वित्तीय वर्षाच्या वार्षिक वित्तीय विवरणपत्रात पूर्वकल्पित नसलेल्या एखाद्या नवीन सेवेकरता पूरक किंवा अतिरिक्त खर्चाची त्या वर्षात गरज उद्भवली असेल तर, किंवा
(ख) एखाद्या वित्तीय वर्षात कोणत्याही सेवेवर त्या सेवेकरता व त्या वर्षासाठी मंजूर केलेल्या रकमेहून काही अधिक पैसा खर्च झाला असेल तर, राष्ट्रपती, संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर त्या खर्चाची अंदाजित रक्कम दर्शविणारे दुसरे विवरणपत्र ठेवण्याची व्यवस्था करील, किंवा यथास्थिति, अशा अधिक रकमेची मागणी लोकसभेपुढे सादर करण्याची व्यवस्था करील.
(२) अनुच्छेद ११२, ११३ व ११४ यांच्या तरतुदी, वार्षिक वित्तीय विवरणपत्र व त्यात नमूद केलेला खर्च किंवा अनुदानार्थ मागणी आणि असा खर्च किंवा अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशांचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कायद्याच्या संबंधात जशा प्रभावी आहेत, तशाच त्या, उपरोक्त असे कोणतेही विवरणपत्र आणि खर्च किंवा मागणी यांच्या संबंधात आणि असा खर्च किंवा अशा मागणीच्या बाबतीत अनुदान भागवण्याकरता भारताच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन प्राधिकृत करण्यासाठी करावयाच्या कोणत्याही कायद्याच्या संबंधातही प्रभावी असतील.

Leave a Reply