Child labour act कलम ७ : कामाचे तास व कालावधी :

बाल कामगार अधिनियम १९८६
कलम ७ :
कामाचे तास व कालावधी :
१) कोणत्याही १.(किशोराला) कोणत्याही आस्थापनेमध्ये, अशा आस्थापनेसाठी किंवा आस्थापनांच्या वर्गासाठी विहित करण्यात येईल तितक्या तासांहून अधिक काळ काम करावयास लावण्यात येणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही.
२) प्रत्येक दिवशी कामाचा कालावधी हा, तीन तासांहून अधिक होणार नाही अशा रीतीने निश्चित करण्यात येईल आणि कोणत्याही १.(किशोराने) विश्रांतीसाठी किमान एका तासाचे मध्यंतर घेतल्याशिवाय, त्याला तीन तासांपेक्षा अधिक काळ काम करता येणार नाही.
३) १.(किशोराच्या) कामाचा कालावधी अशा तऱ्हेने योजण्यात येइल ती, जेणेकरुन पोटकलम (२) खालील त्याच्या विश्रांतीच्या मध्यंतरासह कामाच्या प्रतीक्षेत घालवलेला वेळ धरुन, तो, कोणत्याही दिवशी सहा तासांपेक्षा अधिक होणार नाही.
४) कोणत्याही १.(किशोरास), संध्याकाळी ७ ते सकाळी ८ या वेळेत काम करण्याची परवानगी मिळणार नाही किंवा काम करावयास लावले जाणार नाही.
५) कोणत्याही १.(किशोरास) अतिकालिक काम करावे लागणार नाही किंवा काम करण्यास परवानगी मिळणार नाही.
६) कोणताही १.(किशोर), एखाद्या आस्थापनेत ज्या कोणत्याही दिवशी अगोदर काम करीत असेल त्या दिवशी त्याला दुसऱ्या आस्थापनेत काम करण्यास लावता येणार नाही किंवा काम करण्याची परवानगी देण्यात येरार नाही.
——-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ११ द्वारा बालक या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply