Bsa कलम ६० : दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६० :
दस्तऐवजासंबंधी दुय्यम परावा देता येईल असे प्रसंग:
पुढील प्रसंगी दस्तऐवजाच्या अस्तित्वाचा, स्थितीचा किंवा मजकुराचा दुय्यम पुरावा देता येईल:
(a) क) एक) ज्या व्यक्तीविरूद्ध दस्तऐवज शाबीत करावयाचा आहे तिच्या, अथवा
दोन) जी व्यक्ती त्या न्यायालयाच्या आदेशिकेच्या कक्षेबाहेर आहे किंवा त्या आदेशिकेच्या अधीन नाही तिच्या, अथवा
तीन) जी व्यक्ती तो दस्तऐवज हजर करण्यास कायद्याने बांधलेली आहे तिच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली मूळ लेख असल्याचे दाखवण्यात आले असेल किंवा तसे दिसत असेल,
आणि कलम ७० मध्ये उल्लेखिलेली नोटीस देण्यात आल्यानंतर अशी व्यक्ती तो हजर करीत नाही तेव्हा;
(b) ख) ज्या व्यक्तीच्या विरूद्ध तो दस्तऐवज शाबीत करण्यात यावयाचा तिने किंवा तिच्या हितसंबंध-प्रतिनिधीने मूळ लेखाचे अस्तित्व, स्थिती किंवा मजकूर लेखी कबूल केला असल्याचे शाबीत करण्यात आले असेल तेव्हा;
(c) ग) मूळलेख नष्ट किंवा गहाळ झालेला असेल अथवा त्यातील मजकुराचा पुरावा देऊ पाहाणारा पक्षकार त्याच्या स्वत:च्या कसुरीमुळे किंवा हयगयीमुळे नव्हे तर अन्य कारणामुळे, तो वाजवी अवधीत हजर करू शकत नसेल तेव्हा;
(d) घ) मूळलेख सहजगत्या हलवण्यासारखा नाही अशा स्वरूपाचा असेल तेव्हा;
(e) ङ) मूळलेख कलम ७४ च्या अर्थानुसार सार्वजनिक दस्तऐवज असेल तेव्हा;
(f) च) मूळलेख हा या अधिनियमानुसार किंवा भारतात अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यानुसार पुराव्यात ज्याची प्रामणित प्रत देण्यास मुभा आहे असा दस्तऐवज असेल तेव्हा;
(g) छ) मूळलेखामध्ये बऱ्याच हिशेबांचा किंवा अन्य दस्तऐवजांचा अंतर्भाव असून न्यायालयात ते सोयीस्करपणे तपासणे शक्य नसेल आणि संपूर्ण संग्रहाची एकंदर निष्पत्ती काय हे शाबीत करावयाचे तथ्य असेल तेव्हा.
स्पष्टीकरण :
एक) (a)(क), (c)(ग) व (d)(घ) या खंडात वर्णिलेल्या प्रसंगी, दस्तऐवजाच्या मजकुराचा कोणताही दुय्यम पुरावा ग्राह्य असतो;
दोन) खंड (b)(ख) मध्ये वर्णिलेल्या प्रसंगी, लेखी कबुली ग्राह्य असते;
तीन) खंड (e)(ङ) किंवा (f)(च) मध्ये वर्णिलेल्या प्रसंगी, दस्तऐवजाची प्रमाणित प्रत ग्राह्य असते, पण अन्य कोणत्याही प्रकारचा दुय्यम पुरावा ग्राह्य नसतो;
चार) खंड (g)(छ) मध्ये वर्णिलेल्या प्रसंगी, ज्या कोणत्याही व्यक्तीने ते दस्तऐवज तपासले आहेत, आणि असे दस्तऐवज तपासण्यात जी व्यक्ती कुशल आहे तिला त्या दस्तऐवजांच्या एकंदर निष्पत्तीसंबंधी पुरावा देता येईल.

Leave a Reply