भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ५८ :
दुय्यम पुरावा :
दुय्यम पुरावा यामध्ये-
एक) यात यापुढे अंतर्भूत असलेल्या उपबंधांखाली दिलेल्या प्रमाणित प्रती:
दोन) ज्या प्रती मूळलेखावरून यांत्रिक प्रक्रियांनी तयार केलेल्या असल्यामुळेच अचूक असण्याची सुनिश्चिती होते त्या प्रती आणि अशा प्रतींशी ताडून पाहिलेल्या प्रती;
तीन) ममूळलेखावरून तयार केलेल्या किंवा त्याच्याशी ताडून पाहिलेल्या प्रती;
चार) दस्तऐवजांचे प्रतिलेख ज्या पक्षांनी निष्पादित केले नसतील त्यांच्यापुरते ते प्रतिलेख;
पाच) एखादा दस्तऐवज ज्या व्यक्तीने स्वत: पाहिलेला असेल तिने केलेले त्यातील मजकुराचे तोंडी निवेदन,
सहा) मौखिक कबुल्या (स्वीकृत्या);
सात) लिखित कबुल्या (स्वीकृत्या);
आठ) एखाद्या व्यक्तीची साक्ष्य ज्याने असे कोणतेही दस्तऐवज तपासले आहे, ज्यांमध्ये अनके खाती किंवा इतर दस्तावेज समाविष्ट आहेत, ज्याची न्यायालयात सोयीस्करपणे तपासणी केली जाऊ शकत नाही आणि ती व्यक्ती अशा कागदपत्रांची तपासणी करण्यात कुशल आहे;
हे समाविष्ट आहे.
उदाहरणे :
(a) क) मूळलेख व त्याचे छायाचित्र ही दोन्ही ताडून पाहिली नसली तरीही, ज्याचे छायाचित्र काढले तोच मूळलेख होता असे शाबीत करण्यात आले तर, ते छायाचित्र हा मूळलेखातील मजकुराचा दुय्यम पुरावा होय.
(b) ख) जर प्रतयंत्राद्वारे बनविलेली एखाद्या पत्राची प्रत मूळलेखापासून बनविलेली होती हे सिद्ध झाले तर, त्या प्रतयंत्रावरुन बनवलेल्या प्रतीशी ताडून पाहिलेली प्रत हा त्या पत्राच्या मजकुराचा दुय्यम पुरावा होय.
(c) ग) प्रतीची नक्कल करुन बनविलेली परंतु नंतर मूळलेखाबरोबर ताडून पाहिलेली प्रत दुय्यम पुरावा होय; परंतु जिच्यापासून नक्कल बनविलेली होती ती प्रत मूळलेखाबरोबर ताडून पाहिलेली असली तरी ह्याप्रमाणे न पडताळलेली प्रत मूळलेखाचा दुय्यम पुरावा होत नाही.
(d) घ) मूळलेखाशी ताडून पाहिलेल्या प्रतीतील मजकुराचे तोंडी निवेदन, तसेच लेखाच्या छायाचित्रातील किंवा यंत्राने काढलेल्या प्रतीतील मजकुराचे तोंडी निवेदन हा मूळलेखाचा दुय्यम पुरावा होत नाही.