Bsa कलम ५७ : अव्वल (प्राथमिक) पुरावा :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ५७ :
अव्वल (प्राथमिक) पुरावा :
अव्वल पुरावा याचा अर्थ, न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे.
स्पष्टीकरण १ :
जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केला असेल तेव्हा, दस्तऐवजाचा प्रत्येक भाग हा अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
स्पष्टीकरण २ :
जेव्हा दस्तऐवज सप्रतिलेख निष्पादित केलेला असतो तेव्हा, पत्येक प्रतिलेख, ही निष्पादित करणाऱ्या पक्षकारांपुरता अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
स्पष्टीकरण ३ :
मुद्रणाच्या, शिळामुद्रणाच्या किंवा छायाचित्रणाच्या कार्यपद्धतीप्रमाणे अनेक दस्तऐवज सर्वच्या सर्व एकाच एकरूप प्रक्रियेने तयार करण्यात आले असतील तेव्हा, प्रत्येक दस्तऐवज बाकीच्या दस्तऐवजांतील मजकुराचा अव्वल पुरावा असतो; पण जेव्हा ते दस्तऐवज एकाच मूळ लेखाच्या नकला असतात तेव्हा, ते मूळलेखाच्या मजकुराचा अव्वल पुरावा नसतात.
स्पष्टीकरण ४ :
जिथे डिजिटल अभिलेख सृजित किंवा संग्रहित केले जातात आणि असे संचयन एकसाथ किंवा त्यापश्चात अनेक फाइलींमध्ये अनुक्रमे केले जाते, त्यापैकी प्रत्यके फाइल अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
स्पष्टीकरण ५ :
जेथे कोणतेही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख समुचित अभिरक्षेतून सादर केले जाते, असे इलैक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख आक्षेप घेतल्याशिवाय अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
स्पष्टीकरण ६ :
जेथे व्हिडियो रेकॉर्डिंग इलैक्ट्रॉनिक स्वरुपात संग्रहित केले जाते आणि इतर कोणत्याही व्यक्तिला पारेषित किंवा प्रसारित किंवा हस्तांतरित केले जाते, तेथे प्रत्येक संग्रहित रेकॉर्डिंग हा अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
स्पष्टीकरण ७ :
जेथे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड संगणक संसाधनामध्ये एकापेक्षा अधिक स्टोअरेज स्पेसमध्ये (मल्टिपल स्टोअरेज स्पेस) संग्रहित केला जातो, अशा प्रत्येक स्वयंजलित स्टोअरेजमध्ये तात्पुरत्या फाईल्सचा ही समावेश होतो, हा अव्वल (प्राथमिक) पुरावा असतो.
उदाहरण :
एका व्यक्तीच्या कब्जात अनेक घोषणापत्रके असून ती सर्व एका मूळलेखावरुन एकाच वेळी छापलेली आहेत असे दाखवण्यात आले आहे. घोषणापत्रकांपैकी कोणतेही घोषणापत्रक हे अन्य कोणत्याही घोषणापत्रकावरील मजकुराचा अव्वल पुरावा आहे; पण त्यांच्यापैकी कोणतेही घोषणापत्रक मूळ घोषणापत्रकावरील मजकुराचा अव्वल पुरावा नाही.

Leave a Reply