भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
त्रयस्थ(अन्य) व्यक्तींची मते केव्हा संबद्ध(सुसंगत) :
कलम ३९ :
तज्ज्ञांची(विशेषज्ञ) मते :
१) त्रयस्थ व्यक्तींची मते केव्हा संबद्ध (सुसंगत) जेव्हा विदेशी कायद्याच्या किंवा शास्त्राच्या किंवा कलेच्या एखाद्या मुद्याबाबत अथवा हस्ताक्षर किंवा बोटांचे ठसे हे तेच आहेत किंवा काय याबाबत न्यायालयाला मत बनवावयाचे असेल तेव्हा, अशा विदेशी कायद्यात, शास्त्रात किंवा कलेत किंवा अन्य क्षेत्रात अथवा हस्ताक्षरांची किंवा बोटांच्या ठशांची ओखळ पटवण्याच्या प्रश्नांबाबत विशेष कौशल्य संपादन केलेल्या व्यक्तींची त्या मुद्द्यावरील मते ही सबंद्ध (सुसंगत) तथ्ये असतात आणि अशा व्यक्तींना तज्ज्ञ असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) चा मृत्यु विषामुळे घडून आला होता किंवा काय असा प्रश्न आहे. ज्या विषामुळे (ऐ) मृत्यू पावला असा समज आहे त्यामुळे उद्भवलेल्या लक्षणांबाबतची तज्ञांची मते संबद्ध आहेत.
(b) ख) विवक्षित कृती करण्याच्या वेळी मनोविकलतेमुळे (ऐ) त्या कृतीचे स्वरुप जाणण्यास किंवा आपण जे करत आहोत ते चुकीचे किंवा बेकायदा आहे हे जाणण्यास अक्षम होता किवा काय हा प्रश्न आहे. (ऐ) च्या ठिकाणी दिसून आलेल्या लक्षणांवरुन सर्वसामान्यपणे मनोविकलता दिसून येते किंवा काय, अथवा सामान्यपणे अशा मनोविकलतेमुळे माणसे आपण करत असलेल्या कृतींचे स्वरुप जाणण्यास अथवा आपण जे करत आहोत ते चुकीचे किंवा बेकायदा आहे हे जाणण्यास अक्षम होतात किंवा काय या प्रश्नावरील तज्ञांची मते संबद्ध आहेत.
(c) ग) विवक्षित दस्तऐवज (ऐ) ने लिहिला होता किंवां काय हा प्रश्न आहे. (ऐ) ने लिहिला असल्याचे शाबीत किंवा कबूल करण्यात आले आहे असा दुसरा एक दस्तऐवज हजर करण्यात आला आहे. ते दोन दस्तऐवज एकाच व्यक्तीने लिहिले होते की वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिले होते या प्रश्नावरील तज्ञांची मते संबद्ध आहेत.
२) कार्यवाहीच्या दरम्यान जेव्हा न्यायालयाला संगणक साधनामध्ये पारेषित केलेल्या किंवा साठवलेल्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजीटल स्वरूपात असलेल्या कोणत्याही माहितीच्या संबंधात मत तयार करावयाचे असेल तेव्हा, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००० चा २१) याच्या कलम ७९क (a) मध्ये निर्दिष्ट केलेले इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या तपासनिसाचे मत हे संबद्ध तथ्य असेल.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी इलेक्ट्रॉनिक पुराव्याचा तपासनीस हा तज्ज्ञ असेल.