भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३७ :
कलमे ३४, ३५ आणि ३६ मधील वगळता अन्य न्यायनिर्णय वगैरे केव्हा संबद्ध असतात :
कलमे ३४, ३५ आणि ३६ यांमध्ये नमूद केलेल्याहून अन्य असे न्यायनिर्णय; आदेश किंवा हुकूमनामे असंबद्ध असतात, मात्र, अशा न्यायनिर्णयाचे, आदेशाचे किंवा हुकूमनाम्याचे अस्तित्व हे वादतथ्य असेल किंवा या अधिनियमाच्या अन्या एखाद्या उपबंधाखाली संबद्ध असले तर गोष्ट वेगळी.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) व (बी) यांच्यापैकी प्रत्येकाला दूषण लावणाऱ्या बदनामीकारक मजकुराबद्दल ते अलगअलगपणे (सी) विरुद्ध दावा गुदरतात. जे साहित्य बदनामीकारक असल्याचे अभिकथन करण्यात आले आहे ते खरे आहे असे प्रत्येक प्रकरणात (सी) चे म्हणणे आहे आणि संभवत: प्रत्येक प्रकरणात ते खरे असावे किंवा दोन्ही प्रकरणात ते खरे नसावे अशी परिस्थिती आहे. आपल्या समर्थनासाठी दिलेले कारण शाबीत करण्याच्या कामी (सी) अयशस्वी झाला आहे या कारणावरुन (ऐ) हा (सी) विरुद्ध नुकसानीचा हुकूमनामा मिळवतो. (बी) व (सी) यांच्या दरम्यान हे तथ्य असंबद्ध आहे.
(b) ख) आपल्याकडील गाय चोरल्याबद्दल (ऐ) हा ख वर फिर्याद लावतो. (बी) ला दोषी ठरवण्यात येते. (बी) ने त्याच्या दोषसिद्धीपूर्वी (सी) ला विकलेल्या गायीसाठी नंतर (ऐ) हा (सी) वर दावा लावतो. (ऐ) व (सी) यांच्या दरम्यान ख विरोधी न्यायनिर्णय असंबद्ध आहे.
(c) ग) (ऐ) हा (बी) विरुद्ध जमिनीच्या कब्जासाठी हुकूमनामा मिळवतो. त्याचा परिणाम म्हणून (बी) चा मुलगा (सी) हा (ऐ) चा खून करतो. गुन्ह्यामागील हेतूचे दर्शक म्हणून न्यायनिर्णयाचे अस्तित्व संबद्ध आहे.
(d) घ) (ऐ) वर चोरीचा व चोरीबद्दल पूर्वी त्याला दोषी ठरवण्यात आले असल्याचा दोषारोप आहे. आधीची दोषसिद्धी ही वादतथ्य म्हणून संबद्ध आहे.
(e) ङ) (बी) चा खून केल्याबद्दल (ऐ) ची संपरीक्षा होते. (बी) ने (ऐ) वर बदनामीकारक मजकुराबद्दल फिर्याद लावली व (ऐ) ला दोषी ठरवण्यात येऊन शिक्षा देण्यात आली हे तथ्य हेतूचे दर्शक म्हणून वादतथ्याच्या दृष्टीने कलम ८ खाली संबद्ध आहे.