भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३५ :
प्रोबेट इ. विषयक अधिकारितेच्याबाबत विशिष्ट निकालपत्राची संबद्धता:
१) संप्रमाणविषयक, विवाहविषयक, नौ-अधिकारणविषयक किंवा दिवाळखोरीविषयक अधिकारितेचा वापर करताना सक्षम न्यायालयाने दिलेला जो अंतिम न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा कोणत्याही व्यक्तीला कोणतेही वैध स्थान प्रदान करतो किंवा तिच्याकडऊन ते काढून घेतो, अथवा कोणतीही व्यक्ती अशा कोणत्याही स्थानाला हक्कदार असल्याचे किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट वस्तूला हक्कदार असल्याचे एखाद्या विनिर्दिष्ट व्यक्तीला उद्देशून नव्हे तर सर्वांना उद्देशून जो घोषित करतो तो अंतिम न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा हा, अशा कोणत्याही वैध स्थानाचे अस्तित्व किंवा अशा कोणत्याही व्यक्तीचा अशा कोणत्याही वस्तूवरील हक्क संबद्ध असेल तेव्हा संबद्ध असतो.
२) असा न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनामा म्हणजे, त्याद्वारे –
एक) प्रदान करण्यात आलेले वैध स्थान असा न्यायनिर्णय, आदेश किंवा हुकूमनाम प्रवर्तित झाला त्या वेळी प्राप्त झाले असल्याचा;
दोन) अशी कोणतीही व्यक्ती ज्या कोणत्याही वैध स्थानास हक्कदार असल्याचे अशा न्यायनिर्णयाद्वारे, आदेशाद्वारे किंवा हुकूमनाम्याद्वारे घोषित झाले असेल त्या वेळी ते तिला प्राप्त झाले असल्याचा;
तीन) अशा कोणत्याही व्यक्तीकडऊन जे कोणतेही वैद्ध स्थान काढून घेण्यात आले असेल ते स्थान ज्या वेळेपासून संपुष्टात आले किंवा संपुष्टात यावे असे अशा न्यायनिर्णयाद्वारे, आदेशाद्वारे किंवा हुकूमनाम्याद्वारे घोषित केलेले असेल त्या वेळी ते संपुष्टात आले असल्याचा; आणि
चार) कोणतीही व्यक्ती ज्या कोणत्याही वस्तूला अशाी हक्कदार असल्याचे घोषित करण्यात आले असेल ती वस्तू ज्या वेळेपासून त्या व्यक्तीच्या मालकीची झाली किंवा व्हावी असे, अशा न्यायनिर्णयाद्वारे आदेशाद्वारे किंवा हुकूमनाम्याद्वारे घोषित झाले असेल त्या वेळी ती त्या व्यक्तीच्या मालकीची झाली असल्याचा, निर्णायक पुरावा असते.