भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
ज्यांना साक्षीदार म्हणून बोलावणे शक्य नसते त्या व्यक्तींनी केलेली कथने :
कलम २६ :
जी व्यक्ती मरण पावली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही वगैरे अशा व्यक्तीचे संबद्ध (सुसंगत) तथ्य कोणत्या परिस्थितीत संबद्ध (सुसंगत) असेल :
जी व्यक्ती मृत्यू पावली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही किंवा जी साक्ष देण्यास असमर्थ झाली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही किंवा खर्च झाल्याशिवाय जिला समक्ष हजर करणे शक्य नसून त्या प्रकरणाच्या परिस्थितीत तसे करणे न्यायालयाला गैरवाजवी वाटते अशा व्यक्तीने केलेली संबद्ध (सुसंगत) तथ्यांची लेखी किंवा मौखिक कथने हीच पुढील प्रसंगी संबद्ध (सुसंगत) तथ्ये असतात :-
(a) क) ज्या कामात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाबाबतचा प्रश्न उपस्थित झाला असेल त्या कामात, जेव्हा त्या व्यक्तीने आपल्या मृत्यूच्या कारणांसंबंधी किंवा ज्या घडामोडीचे पर्यवासन तिच्या मृत्यूत झाले त्यातील कोणत्याही परिस्थितिविशेषासंबंधी कथन केले असेल तेव्हा. अशी कथने करणाऱ्या व्यक्तीला कथन करण्याच्या वेळी मृत्यू अपेक्षित असला वा नसला तरीही व ज्या कार्यवाही तिच्या मृत्यूच्या कारणाबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे तिचे स्वरूप काहीही असले तरीही, ती कथने संबद्ध(सुसंगत) असतात.
(b) ख) जेव्हा ते कथन अशा व्यक्तीने सामान्या व्यवहारक्रमानुसार केलेले असेल व विशेषत: जेव्हा ते सामान्य व्यवहाराक्रमानुसार किंवा व्यावसायिक काम पार पाडताना तिने ठेवलेल्या पुस्तकात तिने केलेल्या कोणत्याही नोंदीच्या किंवा टाचणाच्या स्वरूपात अथवा पैसे, माल, रोखे किंवा कोणत्याही प्रकारची मालमत्ता मिळाल्याबद्दल तिने लिहून दिलेल्या किंवा स्वाक्षरित केलेल्या पोचपावतीच्या स्वरूपात अथवा वाणिज्य-व्यवहारात वापरला जाणारा असा तिने लिहिलेला किंवा स्वाक्षरित केलेला दस्तऐवज या स्वरूपात अथवा प्राय: ज्या पत्रावर किंवा अन्य दस्तऐवजावर दिनांक घालण्याचे, तो दस्तऐवज लिहिण्याचे किंवा त्यावर स्वाक्षरी करण्याचे काम बहुश: ती व्यक्ती करते त्यावरील दिनांकाच्या स्वरूपात असेल तेव्हा.
(c) ग) असे कथन जेव्हा ते करणाऱ्या व्यक्तीच्या द्रव्यविषयक किंवा स्वामित्वविषयक हितसंबंधाविरूद्ध असेल किंवा ते खरे असल्यास त्यामुळे तो फौजदारी खटल्याला किंवा नुकसानीच्या दाव्याला पात्र होऊ शकेल किंवा पात्र होऊ शकला असता असे असेल तेव्हा.
(d) घ) जो कोणताही सार्वजनिक हक्क किंवा रूढी अथवा सार्वजनिक किंवा सर्वसाधारण हितसंबंधाची बाब अस्तित्वात असल्यास ज्याचे अस्तित्व अशा कोणत्याही व्यक्तीला माहीत असणे संभाव्य झाले असते त्याच्या अस्तित्वासंबंधी तिचे मत अशा कथनात प्रदर्शित केलेले असेल आणि जेव्हा असा हक्क, रूढी किंवा बाब यासंबंधी कोणताही वाद उपस्थित होण्यापूर्वी असे कथन केले गेले असेल तेव्हा.
(e) ङ) विवक्षित व्यक्तींमधील रक्ताच्या, सोयरिकीच्या किंवा दत्तकाच्या नात्याबाबात कथन करण्यात आले असून ते कथन करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्यमधील रक्ताचे, सोयरिकीचे किंवा दत्तकाचे नाते माहीत असण्याची विशेष साधने उपलब्ध होती आणि वादाचा प्रश्न उपस्थित केले जाण्यापूर्वी ते कथन केले होते असे असेल तेव्हा.
(f) च) जेव्हा ते कथन मृत व्यक्तींच्या दरम्यान असलेल्या कोणत्याही (रक्ताच्या, सोयरिकीच्या किंवा दत्ताकाच्या) नात्याच्या अस्तित्वासंबंधी असेल व अशी मृत व्यक्ती ज्या कुटुंबातील होती त्याच्या काराभारासंबंधीच्या कोणत्याही मृत्युपत्रात किंवा विलेखात अथवा कोणत्याही कौटुंबिक वंशावळीत किंवा कोणत्याही थडग्याच्या शिळेवर, कौटुंबिक तसबिरीवर अथवा अशी कथने सामान्यपणे ज्यावर नमूद केली जातात अशा अन्य कोणत्याही वस्तूवर ते नमूद केलेले असेल व वादाचा प्रश्न उपस्थित केला जाण्यापूर्वी असे कथन केले गेले असेल तेव्हा.
(g) छ) जेव्हा ते कथन कलम ११ च्या खंड (क (ऐ)) मध्ये नमूद केलेल्या अशा कोणत्याही संव्यवहारासंबंधीच्या कोणत्याही विलेखात, मृत्युपत्रात किंवा अन्य दस्तऐवजात अंतर्भूत असेल तेव्हा.
(h) ज) जेव्हा ते कथन अनेक व्यक्तींनी केलेले असून प्रस्तुत बाबीशी संबद्ध अशा त्यांच्या भावना किंवा त्यांचे समज करत असेल तेव्हा.
उदाहरणे :
(a) क) (ऐ) चा खून (बी) ने केला होता किंवा काय हा प्रश्न आहे; किंवा ज्या घडामोडीच्या ओघात (ऐ) चा बलात्कार करण्यात आले त्यात तिला झालेल्या जखमांमुळे ती मृत्यु पावते. (बी) ने तिच्यावर बलात्कार केले होते किंवा काय हा प्रश्न आहे; किंवा ज्या परिस्थितीत (ऐ) ला (बी) ने ठार मारले होते त्या परिस्थितीत (ऐ) च्या विधवेला (बी) विरुद्ध दावा लावता येईल अशी ती परिस्थिती आहे किंवा काय हा प्रश्न आहे. (ऐ) ने त्याच्या किंवा तिच्या मृत्युच्या कारणासंबंधी केलेली, अनुक्रमे विचाराधीन खून, बलात्कार व कारवाई योग्य दुष्कृती यांचा निर्देश करणारी कथने ही संबद्ध तथ्ये आहेत.
(b) ख) (ऐ) च्या जन्मतारखेसंबंधीचा प्रश्न आहे. एका शल्यचिकित्सकाने व्यवहारक्रमानुसार नियमितपणे ठेवलेल्या दैनंदिनीत, अमुक दिवशी त्याच्या देखरेखीखाली (ऐ) च्या आईची प्रसूची झाली व तिला मुलगा झाला असे नमूद करणारी जी नोंद आहे ती संबद्ध तथ्य आहे.
(c) ग) अमुक दिवशी (ऐ) नागपुरात होता किंवा काय हा प्रश्न आहे. एका मृत सॉलिसिटरने व्यवहारक्रमानुसार नियमितपणे ठेवलेल्या दैनंदिनीत, अमुक दिवशी तो (ऐ) ला कलकत्यातील नमूद केलेल्या स्थळी विशिष्ट कामाबद्दल त्याच्याशी विचारविनिमय करण्यासाठी भेटला होता असे जे कथन केले आहे ते संबद्ध तथ्य आहे.
(d) घ) अमुक दिवशी एक जहाज मुंबई बंदरातून निघाले होते किंवा काय हा प्रश्न आहे. ते जहाज भाड्याने घेणाऱ्या व्यापारी कंपनीच्या एका मृत सदस्याने, जहाजी माल लंडनमधील आपल्या ज्या व्यवहारप्रतिनिधींच्या हवाली करावयाचा होता त्यांना लिहिलेल्या ज्या प्रत्रात अमुक दिवशी ते जहाज मुंबई बंदरातून निघाले असे नमूद केले आहे ते पत्र हे संबद्ध तथ्य आहे.
(e) ङ) (ऐ) ला विवक्षित जमिनीचे भाडे दिले होते किंवा काय हा प्रश्न आहे. आपण (ऐ) च्या वतीने पैसे स्वीकारले असून (ऐ) च्या आदेशावरुन ते ठेवून घेतले आहेत असे नमूद करणारे (ऐ) च्या मृत अभिकत्र्याने (ऐ) ला लिहिलेले पत्र हे संबद्ध तथ्य आहे.
(f) च) (ऐ) व (बी) हे विधित: विवाहाबद्ध झाले हाते किंवा काय हा प्रश्न आहे. ज्या परिस्थितीत विवाह लावणे हा गुन्हा होऊ शकेल अशा परिस्थितीत आपण त्यांचा विवाह लावला होता हे मृत उपाध्यायाचे कथन संबद्ध आहे.
(g) छ) बेपत्ता असलेल्या (ऐ) या व्यक्तीने विवक्षित दिवशी एक पत्र लिहिले होते किंवा काय हा प्रश्न आहे. त्याने लिहिलेल्या पत्रावर त्या दिवशीचा दिनांक टाकला आहे हे तथ्य संबद्ध आहे.
(h) ज) नौभंगाचे कारण काय होते हा प्रश्न आहे. ज्याला समक्ष हजर करता येत नाही त्या कप्तानाने त्यासंबंधी केलेले अधिकथन हे संबद्ध तथ्य आहे.
(i) झ) अमुक मार्ग हा सार्वजनिक रस्ता आहे किंवा काय हा प्रश्न आहे. तो मार्ग सार्वजनिक आहे असे (ऐ) या गावाच्या पंचायतीच्या सरपंचाने केलेले कथन हे संबद्ध तथ्य आहे.
(j) ञ) विशिष्ट बाजारात विवक्षित दिवशी धान्याचा भाव काय होता हा प्रश्न आहे. मृत व्यवसायी आपल्या सामान्य व्यवहारक्रमानुसार सागितलेला भाव हा संबद्ध तथ्य आहे.
(k) ट) (ऐ) ही मृत व्यक्ती (बी) चा बाप होती किंवा काय हा प्रश्न आहे. (बी) हा आपला मुलगा आहे असे (ऐ) ने केलेले कथन हे संबद्ध तथ्य आहे.
(l) ठ) (ऐ) ची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न आहे. अमुक दिवशी (ऐ) जन्मला असे कळविण्यासाठी (ऐ) च्या बापाने मित्राला लिहिलेले पत्र हे संबद्ध तथ्य आहे.
(m) ड) (ऐ) व (बी) हे विवाहबद्ध झाले होते काय व केव्हा, हा प्रश्न आहे. (बी) चा मृत बाप (सी) याने, अमुक दिवशी त्याच्या मुलीचा (ऐ) शी विवाह झाल्याबद्दल टाचणवहीत केलेली नोंद हे संबद्ध तथ्य आहे.
(n) ढ) एक दुकानाच्या दर्शनी खिडकीवर लावलेल्या रंगीत विडंबनचित्रातून व्यक्त झालेल्या बदनामीबद्दल (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. विडंबनचित्राशी साम्य व त्याचे बदनामीकारक स्वरुप याबाबतचा प्रश्न आहे. बघ्यांच्या जमावाने या मुद्यांबाबत काढलेले उद्गार शाबीत करता येतील.