भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १३७ :
एखाद्या उत्तरामुळे साक्षीदार गुन्ह्यात गोवला जाईल, म्हणून उत्तर देण्याचे बंधनापासून तो मुक्त नाही :
कोणत्याही दाव्यातील अथवा कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाहीतील वादनिविष्ट बाबींशी संबद्ध अशा कोणत्याही बाबीसंबंधीच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याने साक्षीदार गुन्ह्यात गोवला जाईल अथवा तो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे गोवला जाण्यास ते उत्तर साधक होईल अथवा त्यामुळे असा साक्षीदार कोणत्याही प्रकारच्या शिक्षेस किंवा समपहरणास पात्र होईल अथवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पात्र होण्यास ते उत्तर साधक होईल या कारणावरून, अशा प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बंधनापासून साक्षीदाराला मुक्त केले जाणार नाही :
परंतु, असे जे कोणतेही उत्तर देण्याची साक्षीदारावर सक्ती केली जाईल त्यामुळे तो कोणत्याही अटकेला किंवा खटल्याला पात्र होणार नाही, अथवा कोणत्याही कार्यवाहीत अशा उत्तराच्या रूपाने खोटा पुरावा देण्याबद्दलचा खटला खेरीज करून अन्य कोणत्याही फौजदारी कार्यवाहीत ते त्याच्याविरूद्ध शाबीत केले जाणार नाही.