भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ११ :
एखादा हक्क किंवा रूढी ठरविण्याकरिता संबद्ध तथ्ये :
जेथे कोणत्याही हक्काच्या किंवा रूढीच्या अस्तित्वाबाबतचा प्रश्न असेल तेथे, पुढील तथ्ये संबद्ध असतात;
(a) क) ज्याद्वारे प्रस्तुत हक्क किंवा रूढी निर्माण झाली, ते असल्याचा दावा सांगितला गेला, त्यात बदल केला गेला, त्यांना मान्यता दिली गिली, त्यांचा ठामपरे अवलंब केला गेला किंवा ते नाकारले गेले, अथवा जो त्यांच्या अस्तित्वाशी विसंगत होता असा कोणताही व्यवहार;
(b) ख) जेव्हा तो हक्क किंवा ती रूढी असल्याचा दावा सांगितला गेला, त्यांना मान्यता दिली गेली किंवा त्यांचा अवलंब केला गेला अथवा त्यांचा अवलंब विवादास्पद केला गेला, तो ठामपणे चालू ठेवण्यात आला किंवा त्यापासून विचलन झाले ती विवक्षित उदाहरणे.
दृष्टांत :
(ऐ) ला एखाद्या मत्स्यक्षेत्रावर मच्छीमारीचा हक्क आहे किंवा काय हा प्रश्न आहे. ते मत्स्यक्षेत्र (ऐ) च्या पूर्वजांना प्रदान करणारा विलेख, (ऐ) च्या बापाने केलेले मत्स्यक्षेत्राचे गहाण, गहाणाशी ताळमेळ नसलेली अशी (ऐ) च्या बापाने दिलेली नंतरची देणगी, जेव्हा (ऐ) च्या बापाने हक्क वापरला किंवा जेव्हा हक्काचा वापर (ऐ) च्या शेजाऱ्यांनी थांबवला ती विशिष्ट उदाहरणे ही संबद्ध तथ्ये आहेत.