भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११९ :
न्यायालयाला विवक्षित तथ्यांचे अस्तित्व गृहीत धरता येईल :
१) नैसर्गिक घटना, मानवी वर्तन आणि सार्वजनिक व खाजगी व्यवहार यांच्या सामान्यक्रमाचा विशिष्ट प्रकराणाच्या तथ्यांशी असलेला संबंध लक्षात घेता, जे कोणतेही तथ्य घडून आले असण्याचा संभव आहे असे न्यायालयाला वाटते त्याचे अस्तित्व त्याला गृहीत धरता येईल.
उदाहरणे :
(a) क) चोरी झाल्यानंतर थोड्याच वेळात चोरीचा माल ज्याच्या कब्जात सापडेल तो मनुष्य आपल्या कब्जाबद्दल खुलासा करु न शकल्यास, एकतर तो चोर आहे किवा तो माल चोरीचा असल्याचे माहीत असताना त्याने तो स्वीकारला आहे;
(b) ख) सहअपराधीच्या म्हणण्याला महत्वाच्या तपशिलाबाबत पुष्टी न मिळाल्यास, तो विश्वासाला अपात्र आहे;
(c) ग) विनिमयपत्र स्वीकृत किंवा पृष्ठांकित असल्यास, ते सुयोग्य प्रतिफलार्थ स्वीकारण्यात किंवा पृष्ठांकित करण्यात आले होते;
(d) घ) एखाद्या वस्तूचे किंवा परिस्थितीचे अस्तित्व सामान्यत: जितक्या अवधीच्या आप संपुष्टात येते त्याहून अल्प अवधीच्या दरम्यान ती अस्तित्वात असल्याचे दाखवून देण्यात आले तर, ती अजूनही अस्तित्वात आहे ;
(e) ङ) न्यायिक व शासकीय कृती नियमानुसार करण्यात आल्या आहेत;
(f) च) विशिष्ट प्रकरणी सामान्य व्यवहारक्रम अनुसरण्यात आला होता;
(g) छ) जो पुरावा हजर करणे शक्य असून हजर करण्यात आलेला नाही तो हजर केला गेल्यास, तो रोखून ठेवणाऱ्या व्यक्तीला तो प्रतिकूल ठरेल;
(h) ज) एखाद्या माणसावर ज्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विधित: सक्ती नाही त्याचे उत्तर देण्यास त्याने नकार दिला तर, उत्तर दिले गेल्यास ते त्याला प्रतिकूल ठरेल;
(i) झ) आबंधन निर्माण करणारा दस्तऐवज जेव्हा आबद्ध व्यक्तीच्या हातात असेल तेव्हा, आबंधन नष्ट झाले आहे,
असे न्यायालयाला गृहीत धरता येईल.
२) आपल्यासमोर असलेल्या विशिष्ट प्रकरणाला अशी सूत्रे लागू पडतात किंवा नाही याचा विचार करताना न्यायालय पुढील तथ्यांसारखी तथ्येही लक्षात घेईल :-
एक) उदाहरण (a)(क) बाबत. – खूण केलेल्या रुपयाची चोरी झाल्यानंतर तो एका दुकानदाराकडे त्याच्या गल्ल्यात सापडतो, व त्याच्या कब्जाबद्दल तो स्पष्टपणे खुलासा करु शकत नाही, पण आपल्या धंद्याच्या व्यवहारक्रमानुसार तो अनेक रुपये सतत स्वीकारत आलेला आहे;
दोन) उदाहरण (b)(ख) बाबत. – विवक्षित यंत्रसामग्रीची मांडणी करताना हयगयीच्या कृत्याने एका माणसाच्या मृत्युला कारणीभूत झाल्याबद्दल सर्वोत्तम चारित्र्याच्या एका व्यक्तीची संपरीक्षा करण्यात येते. तितकेच चांगले चारित्र्य असलेला (बी) यानेही त्या मांडरीत भाग घेतला होता व नेमके काय करण्यात आले होते याचे तो वर्णन करतो आणि झालेला निष्काळजीपणा (ऐ) व तो स्वत: या दोघांचाही मिळून होतो हे कबूल करुन त्याबद्दल खुलासा करतो;
तीन) उदाहरण (b)(ख) बाबत. – एक गुन्हा अनेक व्यक्तींनी केलेला आहे. गुन्हेगारांपैकी (ऐ), (बी) व (सी) हे तिघेजण जागच्या जागीच पकडले गेले असून त्यांना एकमेकांपासून अलग ठेवण्यात आले आहे. जेणेकरुन (डी) गोवला जाईल अशा प्रकारे प्रत्येकजण गुन्ह्याचा वृत्तांत देतो, आणि ते वृत्तांत एकमेकांना अशा तऱ्हेने पुष्टी देतात की, ज्यामुळे पूर्व संगनमत असणे हे अत्यंत असंभाव्य ठरते;
चार) उदाहरण (c)(ग) बाबत. – विनिमयपत्राचा विकर्षक (ऐ) हा धंदेवाला माणूस होता. (बी) हा स्वीकर्ता अल्पवयीन व अज्ञान असून, तो पूर्णपणष (ऐ) च्या वर्चस्वाखाली होता;
पाच) उदाहरण (d)(घ) बाबत. – एक नदी पाच वर्षांपूर्वी विवक्षित मार्गाने वाहत होती, पण त्या वेळेपासून पूर आलेले आहेत असे कळते, त्यामुळे तिचा मार्ग बदलला असण्याची शक्यता आहे;
सहा) उदाहरण (e)(ङ) बाबत. – जी न्यायिक कृती नियमानुसार आहे किंवा काय असा प्रश्न आहे ती अपवादात्मक परिस्थितीत करण्यात आली होती;
सात) उदाहरण (f)(च) बाबत. – एक पत्र मिळाले होते की नाही हा प्रश्न आहे. ते डाकेत टाकले होते हे दाखवून देण्यात आले आहे, पण अडथळे आल्यामुळे डाकेच्या नित्यक्रमात व्यत्यय आला होता;
आठ) उदाहरण (g)(छ) बाबत. – जिच्यावरुन एखाद्या मनुष्यावर दावा लावण्यात आला आहे अशा कमी महत्वाच्या एखाद्या संविदेशी ज्याचा संबंध पोचू शकेल, पण ज्यामुळे त्याच्या कुटुंबियांच्या भावनांना व इभ्रतीलाही धक्का पोचेल असा दस्तऐवज हजर करण्यास तो नकार देतो;
नऊ) उदाहरण (h)(ज) बाबत. – एखाद्या माणसावर ज्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विधित: सक्ती नाही त्याचे उत्तर देण्यास तो नकार देतो, पण ज्या बाबतीत तो प्रश्न विचारला गेला आहे तिच्याशी संबंध नसलेल्या बाबतीत अशा उत्तरामुळे त्याचे नुकसान होऊ शकेल;
दहा) उदाहरण (i)(झ) बाबत. – एक बंधपत्र आबंधकाच्या कब्जात आहे, पण प्रकरणाची परिस्थिती अशी दिसते की, ते त्याने चोरलेले असण्याची शक्यता आहे.