Bp act 1951 कलम २: व्याख्या

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २:
व्याख्या
विषयात किंवा संदर्भात काहीही प्रतिकूल नसेल तर, या अधिनियमात,
१)गुरेढोरे या संज्ञेत हत्ती, उंट, घोडे, गाढव, खेचरे, मेंढ्या, शेळ्या व डुकरे यांचा समावेश होतो;
१.(१अ) सक्षम प्राधिकारी याचा अर्थ कलम २२न मध्ये नमूद केलेला सक्षम प्राधिकारी, असा आहे;)
२)महानगरपालिका या सज्ञेचा अर्थ मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ ड २.(किंवा नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम, १९४८) या अन्वये रचना केलेली महानगरपालिका असा होतो.
३)सक्षम प्राधिकारी हा शब्दप्रयोग या अधिनियमाच्या उपबंधांन्वये कोणत्याही, शक्तींचा वापर करण्याच्या किंवा कोणतेही कर्तव्य किंवा काम पार पाडण्याच्या संदर्भात वापरण्यात आला असेल तेव्हा त्याचा अर्थ-
अ)बृहन्मंबईच्या संबंधात आणि ज्या इतर क्षेत्रांकरिता कलम ७ अन्वये पोलीस आयुक्ताची नेमणूक केलेली असेल त्या क्षेत्राच्या संबंधात, आयुक्त, असा होतो,
ब)खंड (अ) मध्ये उल्लेख केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांच्या संबंधात, राज्य शासनाने त्या संबंधात विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेली असेल तेव्हा जिल्हा दंडाधिकारी किंवा ३.(अधीक्षक) किंवा अप्पर अधीक्षक, असा होतो,
४.(क)महसूल विभागाच्या संबंधात महसूल आयुक्त असा होतो.)
४)पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) या संज्ञेचा अर्थ, कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी, असा होतो.
५.(४अ)नृत्य शाळा याचा अर्थ, जेथे फी भरल्यानंतर किंवा अन्य कोणताही मोबदला घेऊन किंवा घेतल्याशिवाय प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या कडून नृत्याचा सराव किंवा अभ्यास करण्यात येतो अशी कोणतीही जागा (मग तिला कोणत्याही नावाने संबोण्यात येत असो) असा होतो; परंतु जेथे अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून नृत्य शिकविण्यात येते किंवा त्याचा सराव करण्यात येतो व ज्या संस्थेस या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी शासनाद्वारे किंवा शासनाने त्यासाठी रीतसर प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याद्वारे रितसर मान्यता देण्यात येते अशा कोणत्याही संस्थेचा अशा नृत्य शाळेत समावेश होणार नाही.)
६.(४अ-१)शिपाई दल याचा अर्थ, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक उप निरीक्षक, असा आहे;)
५)जिल्हा या संज्ञेचा अर्थ ७.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (आत्ताचा १९७३)) च्या प्रयोजनांकरिता जिल्हा म्हणून बनविण्यात आलेला प्रादेशिक विभाग, असा होतो, परंतु त्यामध्ये ८.(कलम ७ अन्वये ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे अशा कोणत्याही क्षेत्राचा) समावेश होत नाही.
९.(५अ)खाद्यगृह म्हणजे, ज्या कोणत्याही स्थानी लोकांना प्रवेश दिला जातो व जेथे अशा स्थानाचा मालक असणाऱ्या किंवा त्यात हितसंबंध असणाऱ्या किंवा ज्याची व्यवस्था पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून या जागेवर खाण्यापिण्याकरिता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय पुरवण्यात येते ते स्थान, आणि त्यात अल्पोपाहारकक्ष, उपाहारगृह, कॉफीगृह यांचा किंवा ज्या दुकानात किंवा दुकानाजवळ लोकांस खाण्यापिण्याकरिता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय पुरवण्यास येते अशा दुकानाचा समावेश होतो, परंतु त्यात सार्वजनिक करमणुकीच्या स्थानाचा समावेश होत नाही.)
१०.(६)महा संचालक व महानिरीक्षक, अप्पर महासंचालक व महानिरीक्षक, विशेष महानिरीक्षक, आयुक्त, १९.(विशेष आयुक्त), सह आयुक्त, अपर आयुक्त,उप महानिरीक्षक, उप आयुक्त, सहायक आयुक्त, अधीक्षक, अपर अधीक्षक, सहायक अधीक्षक व उप अधीक्षक याचा अर्थ, या अधिनियमान्वये नेमलेला किंवा नेमण्यात आल्याचे मानण्यात आलेला अनुक्रमे पोलीस महासंचालक व महानिरिक्षक, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त, १९.(विशेष पोलीस आयुक्त), पोलीस सह आयुक्त, पोलीस अपर आयुक्त, पोलीस उपमहानिरिक्षक (कलम ८अ अन्वये नेमलेला संचालक पोलीस बिनतारी संदेश आणि पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस मोटार वाहन, यांसह) पोलीस उप आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (कलम ८ अ किंवा २२ अ अन्वये नेमलेल्या अधीक्षकासह) अपर पोलीस अधीक्षक, सहायक पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक असा आहे.)
११.(६अ) सर्वसाधारण बदली याचा अर्थ, १२.(कलम २२ न च्या पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेला सर्वसाधारण कालावधी पूर्ण झाल्यानंतर ) दर वर्षाच्या एप्रिल व मे महिन्यांमध्ये पोलीस दलातील पोलीस कर्मचारीवर्गाची एका पदावरुन, कार्यालयातून किंवा विभागातून दूसऱ्या पदावर, कार्यालयात किंवा विभागात पदस्थापना होणे, असा आहे;
६ब) मूदतपूर्व बदली याचा अर्थ, सर्वसाधारण बदली व्यतिरिक्त पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची बदली होणे, असा आहे;)
१३.(७)नगरपालिका संज्ञेचा अर्थ, राज्याच्या कोणत्याही भागात त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीअन्वये स्थापन केलेली नगरपालिका किंवा पौर पालिका असा होतो,परंतु, तीत महापालीकेचा समावेश होत नाही;)
१४.(७अ)नागपूर शहर महानगरपालिकेच्या संबंधात महानगरपलिका आयुक्त या संज्ञेचा अर्थ, मुख्य कार्यकारी अधिकारी असा होतो, मग त्यास कोणत्याही नावाने संबोधण्यात येत असा;)
८)जागा या संज्ञेत कोणतीही कायम किंवा तात्पुरत्या स्वरुपाची इमारत तंबू, मंडप किंवा इतर इमला किंवा कोणतेही परिवेष्टित किंवा खुले क्षेत्र यांचा समावेश होतो;
९)सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान या शब्दप्रयोगाचा अर्थ संगीत, गायन, नृत्य किंवा कोणतेही मनोरंजन किंवा खेळ यांची किंवा यांच्या साधनांची सोय ज्यात केलेली असते आणि ज्यात पैसे घेऊन लोकांस प्रवेश देण्यात येतो, किंवा प्रवेश दिलेल्या व्यक्तींकडून पैसा गोळा करणत्याच्या उद्देशाने त्यांस प्रवेश देण्यात येतो, असे कोणतेही स्थान असा होतो व त्यात शर्यतीचे मैदान, सर्कस, नाटकगृह, चित्रपटगृह, संगीतगृह, बिलियर्ड रुम, बँगाटेल रुम, व्यायाम शाळा, दांडपट्ट्याची शाळा, पोहण्याची जागा (स्विqमग पूल) किंवा नृत्यगृह यांचा समावेश होतो;
१५.(१०)सार्वजनिक करमणुकीचे स्थान म्हणजे, निवासगृह, भोजन आणि निवासगृह किंवा निवासी हॉटेल आणि त्या संज्ञेत, अशा जागेत किंवा जागेजवळ (मधुशाळा (टॅव्हर्न), मद्यगृह, बीअरचे दुकान किंवा मद्यार्क, नाडी, ताडी, गांजा, भांग किंवा अफू याचे दुकान यासारख्या) ज्या कोणत्याही खाद्यगृहात लोकांस कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा मादक औषधी द्रव्य खाण्यापिण्यासाठी पुरवण्यात येते अशा खाद्यगृहाचा समावेश होतो;)
१६.(१०अ) पोलीस आस्थापना मंडळ कम्रांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ १७.(,आयुक्तालयस्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ व विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरांवरील पोलीस आस्थापना मंडळ ) याचा अर्थ, अनुक्रमे, कलमे २२क, २२इ, २२ग १७.(,२२ आय, २२ जे-१ व २२ जे-३) अन्वये घटित केलेली मंडळे, असा आहे;)
११)पोलीस अधिकारी या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमान्वये नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो अणि तीत कलम २१ किंवा २२ अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी याचा समावेश होतो;
१६.(११अ) पोलीस कर्मचारीवर्ग याचा अर्थ, या अधिनियमान्वये नेमणूक झालेला किंवा नेमणूक झाली असल्याचे मानण्यात आलेला असा पोलीस दलाचा कोणताही सदस्य, असा आहे;
११ब) पद याचा अर्थ, पोलीस महासंचालक व महानिरीक्षकाच्या आस्थापनावर निर्माण केलेले कोणतेही पद आणि त्यात राज्य किंवा केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर पोलीस कर्मचारीवर्गासाठी नेमून दिलेल्या पदांचा समावेश असेल, असा आहे;)
१२)विहित या संज्ञेचा अर्थ नियमान्वये विहित असा होतो;
१३)सार्वजनिक जागा या संज्ञेत किनाऱ्यालगतचा प्रदेश, प्रत्येक सार्वजनिक इमारतीच्या किंवा स्मारकाच्या जवळपासची जागा आणि पाणी काढण्याकरिता, धुण्याकरिता, किंवा स्नानाकरिता किंवा मनोरंजनाकरिता जेथे लोकांना जाण्यायेण्याची मोकळीक असते त्या सर्व जागा यांचा समावेश होतो;
१८.(१३अ) महसूल आयुक्त या संज्ञेचा अर्थ, मुंबई जमीन महसूल अधिनियम, १८७९ याच्या कलम ६-अ अन्वये नेमलेला विभागाचा आयुक्त असा होतो;)
१४)नियम या संज्ञेचा अर्थ या अधिनियमान्वये केलेले नियम असा होतो;
१६.(१४अ) कलम याच अर्थ, या अधिनियमाचे कलम, असा आहे;)
६.(१४अ-१) विशेषीकृत अभिकरणे याचा अर्थ, गुन्हा अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलीस दल, दहशतवाद विरोधी पथक, महामार्ग वाहतूक व प्रशिक्षण संचालनालय, असा आहे;
१४ब) राज्य शासन याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे;
१४क) राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभागस्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण याचा अर्थ, अनुक्रमे, कलमे २२प व २२स अन्वये घटित केलेली प्राधिकरणे, असा आहे;
१४ड) राज्य सुरक्षा आयोग याचा अर्थ, कलम २२ब अन्वये घटित केलेला राज्य सुरक्षा आयोग, असा आहे;)
१५)रस्ता या संज्ञेत कोणताही महामार्ग, पूल आणि बांधावरचा मार्ग, सेतूमार्ग, किमान, घाट किंवा धक्का किंवा कोणतीही सडक, गल्ली, पाऊलवाट, चव्हाटा, चौक जेथे लोकांस जाण्यायेण्याची मोकळीक असेल अशी कोणतीही आळी किंवा वाट, मग ती रहदारीची असो किंवा नसो, यांचा समावेश होतो;
१६)दुय्यम अधिकारी या संज्ञेचा अर्थ, निरीक्षकाच्या खालच्या दर्जाची पोलीस बलातील व्यक्ती असा होतो;
१७)वाहन या संज्ञेचा अर्थ कोणतीही गाडी, खटारा, यान (व्हॅन), उघडी गाडी, मालमोटार (टड्ढक), हातगाडी किंवा कोणत्याही प्रकारचे इतर वाहन असा होतो व तीत, दुचाकी (बायसिकल), तिचाकी (टड्ढायसिकल), रिक्षा, स्वयंचलित गाडी, जहाज, किंवा विमान यांचा समावेश होतो.
——–
१. सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, कलम २ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३ व अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
७. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.
८. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याचे कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईचा या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
९. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ च्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१०. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २ अन्वये मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
११. सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१२. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम २ अन्वये दोन वर्षांचा सर्वसाधारण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१३. सन १९५१ चा मुबंई अधिनियक क्रमाकं ३४ याच्या कलम ५ अन्वये मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१४. सन १९५१ चा मुबंई अधिनियक क्रमाकं ३४ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१५. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम २ अन्वये मूळ खंडा ऐवजी समाविष्ट केले.
१६. सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१७. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम २ अन्वये एक) व आयुक्तालयस्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ व दोन) व २२ आय या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१८. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याचे कलम ३, अनुसूची या अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१९. सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट केले.

Leave a Reply