Bp act कलम ९६ : विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९६ :
विवक्षित बाबतीत अधिकाऱ्यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती :
१) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) याची कलमे १२९, १३०, १६७ चे पोट-कलमे (२) आणि कलम १७३ काहीही अंतर्भूत असले तरी,
(एक) २.(आयुक्ताच्या प्रभाराखाली येणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात) आयुक्तास, त्या संहितेची कलमे १२९ आणि १३० खालील दंडाधिकाऱ्याच्या शक्तींचा वापर करता येईल आणि कर्तव्ये पार पाडता येतील.
(दोन) संहितेच्या कलम १६७ च्या पोट-कलम (२) अन्वये एखाद्या आरोपी व्यक्तीस ज्या इलाखा शहर दंडाधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले असेल त्या इलाखा शहर दंडाधिकाऱ्यास, उक्त खटला चालविण्यासाठी त्यास अधिकारिता असो वा नसो, उक्त आरोपी व्यक्तीस त्यास योग्य वाटेल अशा अभिरक्षेत एका वेळेस पंधरा दिवसांपेक्षा अधिक नाही इतक्या मुदतीसाठी अटाकवून ठेवण्याबद्दल वेळोवेळी प्राधिकृत करता येईल.
(तीन) पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी, संहितेच्या कलम १७३ अन्वयेचे प्रतिवृत्त आयुक्ताकडे किंवा आयुक्त याबाबतीत निदेश देईल अशा इतर अधिकाऱ्याकडे पाठवील.
२) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) च्या कलम ६२ मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट २.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या कोणत्याही क्षेत्रात) पोलीस ठाणे स्वाधीन असलेल्या अधिकाऱ्यास उक्त कलमात तरतूद करण्यात आलेले कोणतेही प्रतिवृत्त कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे सादर करण्यास भाग पाडू शकणार नाही.
३) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) ची कलमे १२७ आणि १२८ ही बृहन्मुंबईस ३.(आणि ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल अशा कोणत्याही क्षेत्रास) लागू करताना त्यांच्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येईल:
(अ) कलम १२७ मधील पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदारास या शब्दांऐवजी विभागाच्या स्वाधीनाधिकाऱ्यास किंवा या बाबतीत राज्य शासनाने अधिकृत केलेल्या फौजदारापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास हा मजकुर दाखल करण्यात येईल.
(ब) कलम १२८ मधील पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदारास, मग तो इलाखा शहरातील असो किंवा त्या शहराबाहेरील असो या शब्दांऐवजी विभागाच्या स्वाधीनाधिकाऱ्यास किंवा कलम १२७ अन्वये अधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास हा मजकुर दाखल करण्यात येईल.
——–
१. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबई या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply