महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ९५ :
खोटी वजन व माने तपासणे-झडती घेणे, जप्त करणे अधिकार :
१) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) च्या कलम १५३ मध्ये काहीही असले तरी २.(आयुक्ताच्या प्रभाराखाली असलेल्या कोणत्याही क्षेत्रात) आयुक्ताने आणि इतरत्र ३.(अधीक्षकाने) किंवा राज्य शासनाने या बाबतीत विशेष रीतीने शक्ती प्रदान केलेल्या इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही दुकानात किंवा जागेत जी कोणतीही वजने किंवा मापे किंवा वजन करण्याची किंवा मापण्याची कोणतीही यंत्रे वापरण्यात येत असतील किंवा ठेवण्यात येत असतील ती तपासण्याची किंवा झडती घेण्यासाठी त्या दुकानात किंवा जागेत अधिपत्राशिवाय प्रवेश करता येईल.
२) जर अशा दुकानात किंवा जागेत खोटी असल्याबद्दल त्यास संशय येण्यास कारण असेल. अशी वजने किंवा मापे वजन करण्याची किंव मापण्याची यंत्रे सापडली, तर ती त्यास ताब्यात घेता येतील आणि अशा रीतीने ताब्यात घेण्याबद्दलची माहिती तो अधिकारिता असणाऱ्या दंडाधिकाऱ्यास ताबडतोब देईल आणि अशी वजने, मापे किंवा यंत्रे खोटी असल्याचे दंडाधिकाऱ्यास आढळून आले तर त्यांचा नाश करील.
३) जी वजने व मापे, वेळोवेळी, अमलात असलेल्या कोणत्याही विधिअन्वये ठरविण्यात आलेल्या वजनांच्या व मापांच्या प्रमाणाबरहुकूम असल्याचे अभिप्रेत असेल, ती त्या प्रमाणाशी जुळत नसल्यास ती या कलमाच्या अर्थान्वये खोटी आहेत असे समजण्यास येईल.
——-
१. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबई या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.