महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८:
१.(अधीक्षक आणि) अपर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक व उपअधीक्षक यांची नेमणूक :
१) राज्य शासनाला, प्रत्येक जिल्ह्यासाठी किंवा जिल्ह्याच्या भागासाठी किंवा एका किंवा त्याहून अधिक जिल्हयांसाठी २.(एक पोलीस अधीक्षक) व त्यास इष्ट वाटेल त्याप्रमाणे एक किंवा त्याहून अधिक अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आणि पोलीस उपअधीक्षक नेमता येतील.
२) राज्य शासनाला, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, अपर अधीक्षक यास, ज्या जिल्ह्यासाठी त्यास नेमले त्या जिल्ह्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात, या अधिनियमान्वये किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधिअन्वये ३.(अधीक्षकाने) वापरावयाच्या सर्व किंवा कोणत्याही शक्तीचा वापर करण्याची व पार पाडावयाची सर्व किंवा कोणतीही कामे किंवा कर्तव्ये पार पाडण्याची शक्ती प्रदान करता येईल;
३) ३.(अधीक्षकास), राज्य शासनाची आगाऊ परवानगी घेऊन, या अधिनियमान्वये त्याला प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही शक्ती व कामे सहाय्यक अधीक्षक किंवा उपअधीक्षक याजकडे सोपविता येतील :
४.(परंतु असे की, कलम ३३ अन्वये कोणतेही नियम करण्यासंबंधी, त्यांतफेरफार करण्यासंबंधी किंवा ते रद्द करण्यासंबंधी अधीक्षकाने वापरावयाच्या शक्ती, सहय्यक किंवा उप अधीक्षक यांजकडे सोपविण्यात येणार नाहीत.)
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षकाच्या व जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९६५ चा महाराष्ट अधिनियम क्रमाकं १३ याच्या कलम २ अन्वये हे परंतुक समाविष्ट करण्यात आले.