महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ८५ :
इतर बाबतीत कामकाजाची पद्धत :
१) कलम ८३ किंवा ८४ यात न बसणाऱ्या कोणत्याही बाबतीत, यथास्थिती, संबंधित आयुक्त १.(अधीक्षक) किंवा दंडाधिकारी एक उद्घोषणापत्र काढील व त्य पत्रात, अशी मालमत्ता कोणकोणत्या वस्तूंची मिळून झाली आहे ते विनिर्दिष्ट करील व त्या मालमत्तेवर ज्या कोणत्याही व्यक्तीचा हक्क असेल तिने अशा उद्घोषणापत्राच्या तारखेपासून २.(दोन महिन्याच्या आत) आपल्या समक्ष किंवा या बाबतीत तो ज्या कोणत्याही इतर अधिकाऱ्यास नियुक्त करील त्याच्या समक्ष उपस्थित राहून आपला हक्क सिद्ध करावा, असे फर्माविल.
नासणारा माल त्वरित विकणे
२) जर ती मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग त्वरित व स्वाभाविकरीत्या लवकर नाश पावणारा असेल किंवा तीत पशुधन असेल तर किंवा ती मालमत्ता ३.(दोन हजार पाचशे रुपयांहून कमी किमतीची) दिसून येत असेल तर, ती यथास्थिती, संबंधित आयुक्ताच्या, ४.(अधीक्षकाच्या) किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये ताबडतोब लिलावाने विकण्यात यावी; अशा विक्रीच्या निव्वळ उत्पन्नाची व्यवस्था उक्त मालमत्तेच्या व्यवस्थेसंबंधाने यात यापुढे तरतूद केलेल्या रीतीनेच करण्यात येईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १० (अ) (एक) अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १० (अ) (दोन) अन्वये सहा महिन्यांच्या आत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १० (ब) (एक) अन्वये पाच रुपयांहून कमी किंमतीची या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १० (ब) (दोन) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.