महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ७४ :
१.(सन १९६० चा कायदा क्रमांक ५९) मधील अपराधासंबंधी अधिकार :
२.(प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० (ज्याचा यापुढे या कलमात आणि कलमे ७५ व ७७ यात उक्त अधिनियम असा उल्लेख करण्यात आला आहे) याच्या कलम ११ पोट-कलम (१) किंवा कलम १२ अन्वये) एखाद्या प्राण्याच्या संबंधात अपराध करण्यात आला असेल किंवा जेव्हा असा अपराध करण्यात आला आहे असा संशय घेण्यात वाजवी कारण असेल तेव्हा, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास –
अ) प्राण्याला दंडाधिकाऱ्याकडे घेऊन जाता येईल; किंवा
ब) जर आरोपी व्यक्तीचे तसे म्हणणे असेल तर, याबाबत शासनाने शक्ती प्रदान केलेला कोणताही पशुवैद्यकीय अधिकारी असल्यास त्याच्याकडे त्या प्राण्यास घेऊन जाता येईल; किंवा
क) उक्त कलम ३.(***) अन्वये दंडाधिकारी निदेश देईपर्यंत, प्राणी उक्त अधिनियमाच्या ४.(कलम ३५) अन्वये नेमलेल्या कोणत्याही रुग्णावासात औषधोपचारासाठी व तेथे अटकावून ठेवण्यासाठी नेता येईल; किंवा
ड) जेव्हा उक्त प्राणी, त्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे किंवा दंडाधिकाऱ्याकडे नेता येणार नाही अशा शारीरिक अवस्थेत असेल तेव्हा, उक्त प्राण्याच्या अंगावर आढळून येतील अशा जखमा, व्रण, मोडलेली हाडे, ओरखडे किंवा दुखापत झालेल्या इतर खुणा यांचे वर्णन करणारे उक्त प्राण्याच्या अवस्थेसंबंधीचे एक प्रतिवृत्त (अहवाल) दोन किंवा अधिक प्रतिष्ठित व्यक्तींच्या समक्ष लिहून काढता येईल:
परंतु असे की खंड (ब) किंवा (ड) खाली येणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यास, उक्त प्राणी एखाद्या उपचारालयात दवाखान्यात किंवा राज्य शासनाने सामान्य किंवा विशेष आदेशाने मान्य केलेल्या कोणत्याही योग्य जागी अटकावून ठेवण्यासाठी पाठविण्यात यावे आणि तो दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात येईपर्यंत तेथे अटकावून ठेवण्यात आला पाहिजे असा निदेश देता येईल:
परंतु, आणखी असे की, अशा रीतीने अटकावून ठेवण्यात आलेले प्राण्याला शक्य तितक्या कमी वेळात आणि अटकावून ठेवण्यासाठी त्याला ज्या तारखेस पाठविण्यात आले असतील त्या तारखेपासून तीन दिवसांच्या अशा मुदतीच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात येतील आणि उपचारालयात ते अधिक मुदतीपर्यंत अटकावून ठेवण्याबद्दल दंडाधिकाऱ्याने आदेश दिला नसेल तर ते त्याच्या मालकाच्या हवाली करण्यात येतील.
——–
१. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ (क) अन्वये सन १९८० चा अधिनियम क्रमांक ११ व तत्सम विधि या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ (अ) अन्वये प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १८९० याचे कलम ३ किंवा कलम ५ किंवा कलम ६ किंवा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम यांचे कलम ३ किंवा ४ किंवा ५ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ (ब) (दोन) अन्वये पोटकलम (२) आणि (३) हा मजकुर वगळण्यात आला.
४. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ४ (ब) (एक) अन्वये कलम ६ ब चे पोटकलम (१) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.