महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६:
१.(महासंचालक व महानिरीक्षक) अपर व उप १.(महानिरीक्षक) :
१) २.(पोलीस दलास निदेश देण्याकरीता व त्यावर देखरेख ठेवण्याकरिता कलम ४ च्या तरतुदीस अधीन राहून) राज्य शासन पोलीस १.(महासंचालकाची व पोलीस महानिरीक्षकाची) नेमणूक करील व तो या अधिनियमान्वये किंवा तदनुसार किंवा राज्य शासनाने दिलेल्या आदेशान्वये किंवा तदनुसार ज्यांची तरतूद करण्यात येईल अशा शक्तींचा वापर करील आणि अशी कामे करील व कर्तव्ये बजावतील आणि त्याच्यावर अशा जबाबदाऱ्या असतील व त्यास असा प्राधिकार असेल.
३.(१अ) राज्य शासन, सेवेचा कालावधी, अति-चांगला पूर्वोतिहास, अनुभवाचा आवाका, सचोटी व पोलीस दलाचे नेतृत्व करण्यासाठी व्यावसायिक क्षमता यांच्या आधारे त्या संवर्गातील चार जेष्ठतम पोलीस अधिकाऱ्यांमधून पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांची निवड करील.
१ब) एकदा नेमणूक झाल्यावर, पोलीस महासंचालक व महानिरीक्षकाचा किमान पदावधी हा, त्याच्या नियत सेवावधीच्या वयास अधीन राहून कमीतकमी दोन वर्षाचा असेल. तथापि, पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांच्या विरुद्ध, अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियम १९६९ या अन्वये केलेल्या कोणत्याही कारवाईच्या किंवा न्यायालयाने त्याला सिद्धापराधी ठरविल्याच्या किवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, किंवा त्याच्या कर्तव्यातील अक्षम्य कर्तव्यच्युतीबद्दल दोषी ठरविल्याच्या परिणामी, किंवा अन्यथा जर तो आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरला असेल तर, राज्य शासनास त्याला त्याच्या जबाबदारीतून मुक्त करता येईल.)
४.(२)(अ) राज्य शासनाला एक किंवा अधिक अपर महासंचालक व महानिरीक्षक आणि एक किंवा अधिक विशेष महानिरीक्षक आणि एक किंवा अधिक उप महानिरीक्षक नेमता येतील.
(ब) राज्य शासनाला महासंचालक व महानिरीक्षक याचे अधिकार, कामे कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांपैकी कोणतेही अधिकार, कामे, कर्तव्ये व जबाबदारी आणि त्याचा प्राधिकार अपर महासंचालकाला व महानिरीक्षकाला किंवा एखाद्या विशेष महानिरीक्षकाला किंवा उपमहानिरीक्षकाला वापरता, बजावता किंवा यथास्थिति पार पाडता येईल असा निदेश देता येईल.
(क)तेसच राज्य शासनाला सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे असा निदेश देता येईल की, अपर महासंचालक व महानिरीक्षक किंवा एखादा विशेष महानिरीक्षक किंवा एखादा उपमहानिरीक्षक हा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रीतीने व अशा मर्यादेपर्यंत महासंचालक व महानिरीक्षक यास त्याचे अधिकार, कामे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या व प्राधिकार याचा वापर करण्याच्या व पार पाडण्याच्या कामी मदत व सहाय्य करील.)
———
१. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये पोलीस महानिरीक्षक आणि महानिरीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले. १८ डिसेंबर १९८२ पासून दाखल करण्यात आले असे मानण्यात येईल.
२. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट केले.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३ अन्वये मूळ खंडाऐवजी समाविष्ट केले.