Bp act कलम ६६ : जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ६६ :
जनतेसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये :
खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल:
अ) रस्त्यात हतबल झालेल्या किंवा असहाय्य व्यक्तीस आपणास शक्य असेल अशी प्रत्येक प्रकारची मदत करणे आणि नशा चढलेल्या व्यक्तींना व जे वफेडे लोक इकडे-तिकडे फिरत असून ज्यांच्यापासून धोका होण्याचा संभव असेल किंवा स्वत:स सांभाळण्यास असमर्थ असतील अशा वफेड्या लोकांस आपल्या ताब्यात घेणे;
ब) अटक केलेली किंवा अभिरक्षेत ठेवलेली कोणतीही व्यक्ती जखमी किंवा आजारी असल्यास तिच्यासाठी आवश्यक असेल ती मदत मिळविण्याची तात्काळ उपाययोजना करणे आणि अशा व्यक्तीवर पहारा करताना किंवा तीस एका जागेहून दुसऱ्या जागी नेताना तिच्या अवस्थेकडे योग्य लक्ष पुरविणे;
क) अटक केलेल्या किंवा अभिरक्षेत ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीला योग्य अन्न व आसरा देण्याबद्दल व्यवस्था करणे;
ड) झडत्या घेताना निष्कारण उद्धटपणा न करणे व विनाकारण त्रास न देणे;
ई) स्त्रिया व मुले यांच्याशी वागताना सभ्यतेचे नियम काटेकोरपणे पाळणे व वाजवी सौम्यपणाने वागणे;
फ) आगीमुळे हानी किंवा नुकसान न होऊ देण्याबद्दल प्रयत्नांची शिकस्त करणे;
ग) सर्वसाधारण लोकांस होणारे अपघात किंवा संकट टाळण्याकरिता प्रयत्नांची शिकस्त करणे.

Leave a Reply