Bp act कलम ६४: पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण ६ :
पोलिसांच्या कार्यकारी शक्ती आणि कर्तव्ये :
कलम ६४:
पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य :
खालील कामे करणे हे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल:
अ) सक्षम प्राधिकाऱ्याने त्यास वैधरीत्या दिलेले प्रत्येक समन्स तत्परतेने बजावणे व प्रत्येक अधिपत्र किंवा इतर आदेश तत्परतेने पाळणे व बजावणे आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वैधरित्या दिलेले समावेश अमलात आणण्याचा, सर्व वैध मार्गांनी प्रयत्न करणे;
ब) आपणास शक्य असेल तितका प्रयत्न करुन, घडलेल्या दखली अपराधासंबंधी किंवा तसे अपराध करण्याच्या हेतूसंबंधी माहिती मिळविणे आणि जी माहिती व जी तजवीज विधीशी सुसंगत व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे असून अपराध्यास शासन होण्यासाठी किंवा दखली अपराध होऊ न देण्यासाठी व अदखली अपराध आपल्या समक्ष होऊ न देण्यासाठी त्याच्या मते योग्य असेल अशी माहिती देणे व अशी इतर व्यवस्था करणे;
क) आपणास शक्य असेल तितका प्रयत्न करुन, सार्वजनिक उपद्रव निर्माण होण्यास आळा घालणे;
ड) ज्या व्यक्तीस पकडण्यासाठी त्यास वैधरीत्या प्राधिकृत केले असेल आणि जीस पकडण्यास पुरेसे कारण असेल अशा सर्व व्यक्तींना गैरवाजवी विलंब न लावता पकडणे;
ई) दुसरा कोणताही पोलीस अधिकारी आपले काम करते वेळी मदतीस बालावील तेव्हा, किंवा त्याचे काम करते वेळी मदतीची गरज लागेल तेव्हा, अशी मदत ज्यास करावयाची त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत वैध व वाजवी ठरेल अशा रीतीने मदत करणे;
फ) त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीनुसार त्याजकडे सोपविण्यात आलेली कामे करणे.

Leave a Reply