महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५:
पोलीस दलाची रचना :
या अधिनियमाच्या उपबंधास अधीन राहून,
अ) पोलीस दलात, राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ठरवील इतक्या निरनिराळ्या दर्जाच्या व्यक्ती असतील आणि अशा आदेशाद्वारे राज्य शासन ठरवील अशी त्यांची संघटना असेल आणि अशा शक्ती, कामे व कर्तव्ये असतील,
ब) पोलीस दलातील सेवा प्रवेश, वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती या, राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी ठरवील अशा असतील:
परंतु असे की,
(एक) अनुसूची १ चा भाग १ किंवा २ यात उल्लेख केलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये रचना केलेल्या पोलीस दलातील व्यक्तींचा आणि कलम ३ अन्वये पोलीस दलातील व्यक्ती म्हणून समजण्यात येणाऱ्या व्यक्तींचा सेवाप्रवेश, वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती यांचे नियमन करणारे नियम व आदेश खंड (ब) अन्वये रद्द करण्यात किंवा बदलण्यात येईपर्यंत, अमलात असण्याचे चालू राहतील, परंतू त्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये उल्लेख केलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये रचना केलेल्या पोलीस दलातील व्यक्तींच्या बाबतीत, नियमात व आदेशात बदल करणे हे, राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६ याचे कलम ११५, पोट-कलम ७ याच्या परंतुकाच्या अधीन असेल;)
(दोन)भारतीय पोलीस व भारतीय पोलीस सेवा(सर्व्हिस) सेवाप्रवेश, त्यांचे वेतन, भत्ते व सेवेच्या इतर शर्ती यांच्या बाबतीत या खंडातील कोणताही उपबंध लागू होणार नाही.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ८ अन्वये मूळ उपखंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.