महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५९ :
कलमे ५५, १.(५६, ५७ आणि ५७अ) अन्वये आदेश देण्यापूर्वी आपली बाजू ऐकण्याची संधी देणे:
१) कलम ५५, १.(५६, ५७ किंवा ५७ अ) या अन्वये कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यापूर्वी, उक्त कलमांपैकी कोणत्याही कलमान्वये काम करणारा अधिकारी किंवा त्या अधिकाऱ्याने प्राधिकार दिलेल्या निरीक्षकापेक्षा वरच्या दर्जाचा कोणताही अधिकारी तिच्याविरुद्ध करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तक्रारीची सामान्य माहिती त्या व्यक्तीस लेखी कळवील व त्याविषयी स्पष्टीकरण करण्याची वाजवी संधी तिला देईल. जर अशी व्यक्ती तिने हजर केलेल्या कोणत्याही साक्षीदाराची तपासणी करण्याविषयी अर्ज करील तर संबंधित प्राधिकारी किंवा अधिकारी लेखी नमूद करुन ठेवावयाच्या कारणासाठी, असा अर्ज त्रास देण्याच्या किंवा विलंब लावण्याच्या कारणासाठी केलेला आहे असे त्याचे मत असेल तो प्रसंग खेरीजकरुन, असा अर्ज मंजूर करील व अशा साक्षीदाराची तपासणी करील. अशा व्यक्तीने सादर केलेले कोणतेही लेखी निवेदन त्या प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडण्यात येईल. अशा व्यक्तीस आपले स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा तिने हजर केलेल्या साक्षीदारांची तपासणी करविण्यासाठी, अधिवक्त्यामार्फ त किंवा प्रतिनिधीमार्फ त या कलमान्वये काम चालविणाऱ्या अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचा हक्क राहील.
२) पोट-कलम (१) अन्वये काम चालविणाऱ्या प्राधिकाऱ्यास किंवा अधिकाऱ्यास जिच्याविरुद्ध कलम ५५ १.(५६,५७ किंवा ५७अ) अन्वये कोणताही आदेश काढण्याचे योजिले असेल अशी कोणतीही व्यक्ती हजर राहील अशक्ष व्यवस्था करण्यासाठी अशा व्यक्तीस हजर राहण्यास व चौकशीच्या वेळी जामिनांनिशी किंवा जामिनांवाचून प्रतिभूत बंधपत्र करुन देण्यास भाग पाडता येईल. जर ती व्यक्ती असे प्रतिभूती बंधपत्र करुन देण्यात कसूर करील किंवा चौकशीच्या वेळी अधिकाऱ्यासमोर किंवा प्राधिकाऱ्यासमोर हजर राहण्यात कसूर करील तर, त्या अधिकाऱ्याने किंवा प्राधिकाऱ्याने चौकशीचे काम पुढे चालविणे हे विधिसंमत असेल आणि त्यानंतर, त्याजविरुद्ध जो आदेश देण्याचे योजिले होते तो आदेश देता येईल.
———
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियक क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५६ किंवा ५७ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.