महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५७ :
१.(विवक्षित अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या व्यक्तींना काढून लावणे:
१.(१)) जर एखाद्या व्यक्तीला
अ) (एक) भारतीय दंड संहिता यातील प्रकरण बारा, सोळा किंवा सतरा खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा
(दोन) मुंबई मद्यनिषेध अधिनियम १९४९ याच्या कलम ६५,६६अ, किंवा ६८ याखालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा
(तीन) स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास आळा घालण्याबाबत अधिनियम, १९५६ याच्या कलम ३, ४, ५, ६ किंवा ९ खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल;किंवा
(चार) सीमाशुल्क अधिनियम, १९६२ च्या कलम १३५ खालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल; किंवा
(पाच) मुंबईचा जुगार खेळण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १८८७ याच्या कलम ४ खालील अपराधाबद्दल किंवा कलम १२ च्या खंड (अ) अन्वये किंवा कलम १२ अ अन्वये कोणत्याही सार्वजनिक रस्त्यात किंवा रहदारीच्या मार्गात किंवा जेथे लोकांना प्रवेश असेल किंवा प्रवेश अनुज्ञेय असेल अशा कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही रेसकोर्सवर पैज स्वीकारण्याबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल, किंवा
ब) मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ या खालील अपराधाबद्दल, परंतु कलम ६५, ६६अ किंवा ६८ खालील दोषी नसेल अशा अपराधाबद्दल दोनदा किंवा अधिक वेळा दोषी ठरविण्यात आले असेल, किंवा
२.(ब-अ) भारताचा रेल्वे मालमत्तेसंबंधीच्या (अशा प्रकारची मालमत्ता बेकायदेशीर रीतीने कबजात ठेवण्याबाबत) कायदा सन १९६६ अन्वये कलम ३ किंवा ४ अन्वये दोनदा अगर अधिक वेळा दोषी ठरविण्यात आले असेल तर किंवा)
क) या अधिनियमाच्या कलम १२२ किंवा १२४ खालील अपराधाबद्दल तीनदा किंवा अधिक वेळा दोषी ठरविण्यात आले असेल;
तर आयुक्तास, जिल्हा दंडाधिकाऱ्यास किंवा या बाबतीत राज्य शासनाने ३.(***) शक्ती प्रदान केलेल्या उप-विभागीय दंडाधिकाऱ्यास, अशी व्यक्ती ज्या अपराधाबद्दल दोषी ठरली होती त्या अपराधासारखा अपराध ती पुन्हा करण्याचा संभव आहे, असे सकारण वाटत असेल तर त्यास ४.(या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अधिकारी विनिर्दिष्ट करील अशा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून (मग ती क्षेत्रे त्या अधिकाऱ्याच्या स्थानिक हद्दीतील असोत किंवा नसोत आणि ती लगतची असोत किंवा नसोत) आणि अशा मार्गाने आणि अशा वेळेच्या आत निघून जाण्याबद्दल निदेश देण्यात आला असेल अशा विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये (यात यापुढे ज्यांचा निदेश विनिर्दिष्ट क्षेत्र किंवा क्षेत्रे असा केला आहे.) पुन्हा प्रवेश न करण्याबद्दल किंवा न परतण्याबद्दल निदेश देता येईल.)
५.(२) कलम ५७ (१) अन्वये असा हद्दपारीचा हुकूम करतेवेळी आणि असाही आदेश उक्त अधिकाऱ्यास करता येईल की त्याचा हद्दपारीचा मुदतीत हुकूम अमलात असलेल्या मुदतीत त्यास असे फर्माविता येईल की, राज्यात ज्या ठिकाणी तो राहील त्यासंबंधी अगदी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दर महिन्याला एका वेळेस तरी राहते जागेचे ठिकाण बदलले नाही तरी रिपोर्ट केला पाहिजे. पो.ठा. अं. याने त्यास कळविले पहिजे की राज्याच्या हद्दीबाहेर गेल्यास दहा दिवसांचे आत पोस्टाने अगर इतर मार्गाने कळविले पाहिजे. परत आल्यास दहा दिवसांचे आत जवळच्या पो.स्टे.मध्ये कळविले पाहिजे.)
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाकरिता एखाद्या व्यक्तीस ज्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले होते त्या अपराधासारखा अपराध याचा अर्थ :-
(एक) खंड (अ) (एक) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, भारतीय दंड संहितेच्या कोणत्याही प्रकरणाखाली येणारा अपराध, असा होईल, आणि
(दोन) खंड (अ) याचा उप-खंड (एक) वगळून,(ब) आणि (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, उक्त खंडामध्ये अनुक्रमे नमूद केलेल्या अधिनियमांच्या उपबंधाखाली येणारा अपराध, असा होतो.
——–
१. सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ याच्या कलम २ अन्वये कलम ५७ ऐवजी समाविष्ट करण्यात आले आणि सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनिय क्रमांक ३३ याच्या कलम ३(१) अन्वये त्याला पोटकलम (१) असा फेर क्रमांक देण्यात आला.
२. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ३ (१) (अ) अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
३. सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याद्वारे विशेषरीत्या हा शब्द वगळण्यात आला व तो नेहमीकरिता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
४. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ३(१) (ब) अन्वये मुळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
५. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ३(२) अन्वये समाविष्ट करण्यात आले.