Bp act कलम ५६ : अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५६ :
अपराध करण्याचे बेतात असलेल्या व्यक्तींना काढून लावणे:
१.(१)) जेव्हा बृहन्मुंबइत व कलम (७) अन्वये ज्या इतर क्षेत्रासाठी आयुक्त नेमलेला असेल त्या इतर क्षेत्रात आयुक्तास आणि राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन या कलमाचे उपबंध ज्या क्षेत्रास किंवा क्षेत्रांना लागू करील अशा इतर क्षेत्रांत जिल्हा दंडाधिकाऱ्यास किंवा त्याबाबत राज्य शासनाने शक्तीप्रदान केलेल्या २.(***) उप-विभागीय दंडाधिकाऱ्यास जेव्हा असे आढळून येईल की,
अ) कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली किंवा कृत्ये ही, व्यक्तीस किंवा मालमत्तेस भय, धोका किंवा इजा निर्माण करतील किंवा त्यापासून भय, धोका किंवा इजा उत्पन्न होण्याचा संभव आहे किंवा
ब) अशी व्यक्ती जबरीचा किंवा बळाचा उपयोग करण्याचा ज्यात अंतर्भाव होईल असा अपराध किंवा भारतीय दंडसंहिता यातील प्रकरण बारा, सोळा किंवा सतरा या अन्वये शिक्षेस पात्र असा अपराध करीत आहे, किंवा करण्याच्या बेतात आहे किंवा कोणताही असा अपराध करण्यास मदत करीत आहे, किंवा करण्याच्या बेतात आहे आणि अशा अधिकाऱ्याच्या मते आपल्या शरीराच्या किंवा मालमत्तेच्या सुरक्षिततेस धोका पोहोचण्याच्या भीतीमुळे सार्वजनिक जागेत अशा व्यक्तीविरुद्ध साक्ष देण्याकरिता पुढे येण्यास साक्षीदार तयार नाहीत, किंवा
३.(बब) अशी व्यक्ती,
१) महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर धोकादायक कृती करण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८० यामध्ये व्याख्या केलेल्या सार्वजनिक सुव्यवस्थेचे जतन करण्यास घातक ठरेल अशी कोणत्याही रीतीने, किंवा
२) अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करण्यास प्रतिबंध आणि पुरवठा सुरळीत ठेवणे याबाबत अधिनियम, १९८० याच्या कलम ३ च्या पोटकलम (१) याच्या स्पष्टीकरणामध्ये व्याख्या दिल्याप्रमाणे समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या अशा वस्तूंचे जतन करणे आणि पुरवठा यास प्रतिबंध ठरेल. अशा कोणत्याही रीतीने अशी व्यक्ती कृती करीत आहे किंवा करण्याच्या बेतात आहे असे मानण्यास वाजवी कारण असेल किंवा)
क) बाहेरुन आलेली व्यक्ती सतत राहिल्याने रोग उद्भवण्याचा संभव असेल तेव्हा, उक्त अधिकाऱ्यास त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे तिच्यावर योग्य रीतीने बजावलेल्या लेखी आदेशान्वये किंवा दवंडी पिटवून किंवा इतर रीतीने अशा व्यक्तीस किंवा बाहेरुन आलेल्या व्यक्तीस, हिंसा व भय ४.(किंवा असे बाधक कृत्य) यांस प्रतिबंध व्हावा म्हणून किंवा अशा रोगाचा प्रादुर्भाव किंवा प्रसार होऊ नये म्हणून तिने जसे वागणे आवश्यक असेल तसे वागण्याबद्दल किंवा ५.(या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अधिकारी विनिर्दिष्ट करील अशा महाराष्ट्र राज्यातील एका किंवा अधिक क्षेत्रांमधून (मग ती क्षेत्रे त्या अधिकऱ्याच्या स्थानिक हद्दीतील असोत किंवा नसोत आणि ती लगतची असोत किंवा नसोत) आणि अशा मार्गाने आणि अशा वेळेच्या आत निघून जाण्याबद्दल निदेश देता येईल आणि त्याला जेथून निघून जाण्याबद्दल निदेश देण्यात आला असेल अशा विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये (यात यापुढे ज्यांचा निदेश विनिर्दिष्ट क्षेत्र किंवा क्षेत्रे असा केला आहे.) पुन्हा प्रवेश न करण्याबद्दल किंवा न परतण्याबद्दल निदेश देता येईल.)
६.(२) पोटकलम (१) अन्वये कोणत्याही व्यक्तीला राज्यातील कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रामधून किंवा क्षेत्रांमधून निघून जाण्याचा निदेश देणाऱ्या अधिकाऱ्यास, अशा व्यक्तीला आणखी असा निदेश देता येईल की, तिच्या विरुद्धचा आदेश अमलात असेतोपर्यंत, जेव्हा ती राज्यातील इतर कोणत्याही क्षेत्रांत राहील तेव्हा, ती तिच्या पत्त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसला तरी सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास आपले राहण्याचे ठिकाण कळवील. उक्त अधिकाऱ्यास असा देखील निदेश देता येईल की, अशा कालावधीत, ती व्यक्ती राज्यातून बाहेर जाईल तेव्हा राज्याबाहेर गेल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत आपल्या जाण्याची तारीख डाकेने किंवा अन्य प्रकारे, उक्त अधिकाऱ्याला लेखी कळवील आणि ती जेव्हा राज्यामध्ये परत आली असेल व येईल तेव्हा, राज्यात आल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत ती जेथे राहत असेल; त्या ठिकाणच्या सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला आपल्या येण्याची तारीख कळवील.)
——–
१. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम २(१) अन्वये कलम ५६ ला त्या कलमाचे पोटकलम (१) असा नव्याने क्रमांक देण्यात आला.
२. सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम २ अन्वये विशेषरीत्या हा शब्द वगळण्यात आला व तो नेहमीकरिता वगळण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
३. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ याच्या कलम १७ (अ) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
४. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ याच्या कलम १७ (ब) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
५. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम २(१) अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
६. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम २(२) अन्वये पोटकलम (२) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply